Rohit Sharma on Ashwin, IND vs SL 1st Test: भारतीय संघाने श्रीलंकेचा पहिल्या कसोटी सामन्यात दारूण पराभव केला. Virat Kohli ची १००वी कसोटी असलेल्या सामन्यात भारताने पहिल्या डावात ५७४ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघाने पहिल्या डावात १७४ तर दुसऱ्या डावात १७८ धावा केल्या. भारताने सामना एक डाव आणि २२२ धावांनी जिंकला. सामन्यात रविंद्र जाडेजाने १७५ धावा आणि ९ बळी टिपले. त्याच्याव्यतिरिक्त आर अश्विनने ६१ धावा आणि ६ गडी बाद केले. अश्विनने या सामन्यात ४३५वी कसोटी विकेट घेत माजी कर्णधार कपिल देव यांना मागे टाकलं. त्याच्या या कामगिरीनंतर पत्रकारांनी रोहित शर्माला अश्विनबाबत एक प्रश्न विचारला. त्याचं रोहितने अतिशय चलाखीने उत्तर दिले.
रविचंद्रन अश्विन हा प्रतिभावान स्पिनर आहे. मग त्याला परदेशात झालेल्या मालिकांमध्ये संधी का दिली गेली नव्हती. पत्रकाराचा हा प्रश्न हा इंग्लंड दौऱ्यासाठी संबंधित होता. त्यावेळी विराट कोहली संघाचा कर्णधार होता आणि अश्विन-विराट यांच्यात वाद असल्याच्या चर्चा रंगलेल्या होत्या. त्यामुळे रोहितने त्याबद्दल नीट उत्तर दिलं. "अश्विनला देशाबाहेरील कसोटी सामन्यांमध्ये संधी का मिळाली नाही याचं कारण मला माहिती नाही. तो संघात का होता किंवा तो संघातून बाहेर का होता, या दोन्ही गोष्टींची कारणं मला माहिती नाहीत. कारण मी त्यावेळी (इंग्लंड दौऱ्यावर) संघ निवडीच्या निर्णयांमध्ये सहभागी नव्हतो. त्यामुळे त्यावेळी नक्की काय घडलं हे मला सांगता येणं शक्य नाही. अश्विन संघात का नव्हता, त्याला संघात का घेतलं नाही किंवा तो संघात का खेळला नाही, याचं उत्तर मी देऊ शकत नाही", असं रोहित म्हणाला.
दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात रविंद्र जाडेजाच्या नाबाद १७५ धावा आणि रिषभ पंतच्या ९६ धावांच्या दमदार खेळीमुळे भारताने ५७४ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव १७४ धावांवर आटोपला. त्यात जाडेजाने सर्वाधिक चार बळी टिपले. तर दुसरा डाव १७८ धावांत संपुष्टात आला. त्या डावातही जाडेजा आणि अश्विन यांनी सर्वाधिक प्रत्येकी ४-४ बळी घेतले.