Join us

रोहित शर्माला 'सक्तीची विश्रांती'? पाचव्या कसोटीत 'या' स्टार खेळाडूला मिळणार कर्णधारपद

Rohit Sharma Team India Captaincy, Ind vs Aus 5th Test : रोहित शर्माच्या जागी शुबमन गिलची 'प्लेइंग ११' मध्ये पुनरागमन होईल हे देखील जवळपास निश्चित आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 17:58 IST

Open in App

Rohit Sharma Team India Captaincy, Ind vs Aus 5th Test : भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याला बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील (BGT 2024) पाचव्या आणि अखेरच्या कसोटीला मुकावे लागण्याची शक्यता आहे. रोहित शर्माला कदाचित शेवटच्या कसोटीसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला आज झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितच्या संघातील समावेशाबाबत प्रश्न विचारला गेला होता. तेव्हा गंभीरने स्पष्टपणे कुठलेही उत्तर दिले नव्हते. पण आता इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, संघ व्यवस्थापन रोहित शर्माला सक्तीची विश्रांती देऊन त्याच्या जागी संघाचे नेतृत्व जसप्रीत बुमराहकडे (Jasprit Bumrah) देऊ शकते. सिडनीच्या मैदानावर पाचवी कसोटी रंगणार आहे आणि ही कसोटी भारताला WTC Final 2025 च्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. त्यामुळे कदाचित हा कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो असे वृत्त आहे.

गंभीर, आगरकरला रोहितचा निरोप

भारतीय संघ सध्या अशा परिस्थितीत आहे की मालिकेतील शेवटचा सामना भारताला जिंकावाच लागणार आहे. त्यातच रोहित शर्माचा सध्याचा फॉर्म खूपच खराब आहे. गेल्या ३ कसोटीतील ५ डावांत रोहितने केवळ ३१ धावा केल्या आहेत. त्यामुळे रोहित शर्मावर चहुबाजूंनी टीका झाली आहे. तशातच कर्णधार म्हणूनही रोहितची कामगिरी समाधानकारक नसल्याचा सूर चाहते आणि क्रिकेट जाणकारांनी आळवला आहे. तशातच मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्माने स्वत:च विश्रांती घेण्याचा निर्णय भारतीय संघाचा कोच गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर या दोघांना सांगितला आहे. तसेच या दोघांनीही त्याच्या निर्णयावर संमती दर्शवली आहे.

रोहितच्या जागी बुमराह कर्णधार

आजच्या ट्रेनिंग सेशनमध्ये दिसलेल्या चित्रानुसार, रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराहला संघाचे कर्णधार केले जाईल. आजच्या सराव सत्रात गौतम गंभीर आणि जसप्रीत बुमराह एकत्र अनेक गोष्टींची चर्चा करताना दिसले. फिल्डिंगचा सराव सुरु असताना स्वत: गौतम गंभीर आणि बुमराह दोघे तेथे हजर होते. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, रोहित शर्मा सराव सत्रात अगदी शेवटच्या टप्प्यात आला. त्याने फार काळ सराव केला नाही. आजच्या सरावाच्या वेळेत त्याने केवळ साईड आर्म चेंडूफेकीवर फलंदाजीचा सराव केला. मात्र तो सराव नेहमीच्या सत्रांप्रमाणे नव्हता.

रोहितविना संघात असे होऊ शकतात बदल

भारताचा दमदार युवा फलंदाज शुबमन गिल याला चौथ्या कसोटीत संघाबाहेर बसवण्यात आले होते. रोहितच्या जागी आता त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाईल. गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. तर केएल राहुल पुन्हा एकदा यशस्वी जैस्वालसोबत ओपनिंग करेल. रिषभ पंतदेखील त्याच्या पूर्वीच्या स्थानी खेळेल. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे, दुखापतग्रस्त आकाश दीपच्या जागी संघात प्रसिध कृष्णाला संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माजसप्रित बुमराहशुभमन गिलभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघगौतम गंभीर