तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून यजमान भारताने २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांच्या अप्रतिम खेळीच्या जोरावर भारताने दुसरा सामना सहज जिंकला. जैस्वाल आणि दुबे यांनी तिसऱ्या बळीसाठी ९६ धावांची भागीदारी नोंदवली. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली स्वस्तात बाद झाल्यानंतर युवा शिलेदारांनी मोर्चा सांभाळला. शिवम दुबेने मोहम्मद नबीच्या षटकात सलग तीन षटकार ठोकून आपला आक्रमक पवित्रा दाखवून दिला. भारताने २६ चेंडू आणि ६ गडी राखून विजय मिळवला अन् मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली.
यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांच्या खेळीबाबत कर्णधार रोहित म्हणाला की, त्यांच्यासाठी ही काही वर्षे खूप चांगली होती. जैस्वाल आता कसोटी क्रिकेट आणि अगदी टी-२० ही खेळला आहे. तो काय सक्षम आहे हे त्याने दाखवून दिले आहे. त्याच्याकडे प्रतिभा आहे आणि त्याच्याकडे शॉट्सची मोठी श्रेणी आहे. दुबे हा मोठ्या उंचीचा खेळाडू आहे. तो खूप ताकदवान आहे आणि तो फिरकीपटूंचा चांगला सामना करू शकतो. हीच त्याची भूमिका आहे आणि त्याने येऊन आमच्यासाठी दोन महत्त्वाच्या खेळी खेळल्या, असं रोहितने सांगितले.
यशस्वी जैस्वालने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला, नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारताने अफगाण संघाला २० षटकांत १७२ धावांमध्ये गुंडाळले. हे आव्हान भारताने १५.४ षटकांमध्येच पार करताना ४ बाद १७३ धावा केल्या, यशस्वीने ३४ चेंडूत ५ चौकार व ६ षटकारांसह ६८ धावा कुटल्या, दुबेने अखेरपर्यंत नाबाद राहताना ३२ चेंडूत ५ चौकार व ४ षट्कारांसह ६३ धावांचा चोप दिला. पहिल्याच षटकात रोहित शर्मा त्रिफळाचीत झाल्यानंतर यशस्वीने विराट कोहलीसह २८ चेंडूत ५७ धावांची भागीदारी करत अफगाणिस्तानवर दडपण आणले. कोहली १६ चेंडूत ५ चौकारांसह २९ धावा करून बाद झाला.
दरम्यान, भारताने घरच्या भूमीवर सलग सहावी टी-२० मालिका जिंकली आहे. यासह मायदेशात सलग १५व्या मालिकेत अपराजित राहण्याचा भारताचा विक्रम अबाधित आहे. भारताने शेवटची मालिका फेब्रुवारी २०१९मध्ये घरच्या मैदानावर गमावली होती. यानंतर खेळल्या गेलेल्या १५ मालिकांपैकी दोन बरोबरीत सुटल्या. तर १३ भारताच्या नावावर आहेत. अनिर्णित राहिलेल्या दोन्ही मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेल्या. टी-२०मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध यशस्वीरित्या गाठलेले हे दुसरे सर्वोच्च लक्ष्य आहे. श्रीलंका पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने २०२२मध्ये शारजाह येथे अफगाणिस्तानविरुद्ध १७६ धावांचे लक्ष्य गाठले होते. भारत १७३ धावांसह दुसऱ्या तर आयर्लंड १६९ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.