मुंबई : ऑस्ट्रेलियापाठोपाठ न्यूझीलंड दौरा गाजवून भारतीय संघ मायदेशात दाखल झाला. नुकताच बाप माणूस झालेला रोहित शर्माही मुंबईत आला आणि त्यानं सर्वप्रथम मुलगी समायराची भेट घेतली. रोहितला अखेरीस मुलगी समायराला वेळ देण्याची संधी मिळाली. न्यूझीलंडमध्ये भारतीय संघ रोहितच्या नेतृत्वाखाली वन डे मालिकेतील अखेरचे दोन सामने व ट्वेंटी-20 मालिका खेळला. ट्वेंटी-20 मालिकेत भारताला 1-2 अशी हार पत्करावी लागली असली तरी हा दौरा खेळाडूंची कामगिरी उंचावणारा ठरला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान रोहितला कन्यारत्न प्राप्ती झाली. त्यानंतर तो मायदेशी परतला आणि त्यामुळे त्याला सिडनी कसोटीत खेळता आले नव्हते. त्यानंतर वन डे मालिकेसाठी तो आठवडाभरात पुन्हा ऑस्ट्रेलियात परतला. त्यानंतर जवळपास महिनाभर तो मुलीपासून दूर होता. त्यानंतर मायदेशात परतताच रोहितने मुलीसोबत वेळ घालवला. रोहितने गुरुवारी मुलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि तो फोटो चाहत्यांना नक्की भुरळ घालणारा आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर रोहितने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत 89, तर वन डे मालिकेत 169 धावा केल्या. वन डे मालिकेत अंबाती रायुडू आणि शिखर धवन यांच्यानंतर सर्वाधिक धावा नावावर असलेल्या खेळाडूंत रोहित तिसऱ्या क्रमांकावर होता.
''हा क्षण माझ्यासाठी खास आहे, घरी परतल्यानंतर हा क्षण सुखावणारा आहे,'' असे पोस्ट केलेल्या फोटोखाली रोहितने लिहिले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत रोहितने तीन सामन्यांत 185 धावा चोपल्या. त्या मालिकेत भारताने यजमान ऑस्ट्रेलियावर 2-1 असा विजय मिळवला. मात्र, ट्वेंटी-20 मालिकेत भारताला 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. न्यूझीलंडविरुद्धची वन डे मालिका 4-1 अशी जिंकल्यानंतर भारत ट्वेंटी-20 मालिका विजयाच्याही नजीक आला होता, परंतु अखेरच्या सामन्यात अवघ्या 4 धावांनी भारतीय संघ पराभूत झाला.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी आणि वन डे मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवणारा भारतीय संघ कांगारूंचा पाहुणचार करण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा संघ दोन ट्वेंटी-20 आणि पाच वन डे सामने खेळणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे.
मात्र, वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याच्या विचारात आहे. विश्रांती देणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित शर्माचे नाव आघाडीवर आहे आणि लोकेश राहुल व अजिंक्य रहाणे संघात कमबॅक करण्याची शक्यता आहे. याआधी कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या दोन वन डे व ट्वेंटी-20 मालिकेत विश्रांती देण्यात आली होती.
Web Title: Rohit Sharma posts adorable picture with daughter Samaira after returning home
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.