Ishan Kishan Rohit Sharma, India vs Sri Lanka 1st T20 : लखनौमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने एक मोठं विधान केलं. त्या विधानामुळे टीम इंडियातील एक खेळाडू सुखावला. पण रोहितच्या मुंबई इंडियन्सचा त्याचा सहकारी इशान किशन याचं टेन्शन मात्र नक्कीच वाढलं. रोहितने उद्यापासून सुरू होणाऱ्या टी२० मालिकेआधी आज पत्रकार परिषदेत भारतीय विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनबद्दल मोठं वक्तव्य केलं. भारतीय संघ सध्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी ऑडिशन मोडमध्ये आहे. यंदाचा टी२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार असून कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन यासाठी संघबांधणीचे सर्व पर्याय तपासून पाहत आहे. याच वेळी संजू सॅमसनबद्दलच्या रोहितच्या वक्तव्यामुळे इशान किशनचं टेन्शन वाढलं.
रोहित शर्मा म्हणाला, "संघ व्यवस्थापन निश्चितपणे संजू सॅमसनला टी२० विश्वचषकासाठी पर्याय म्हणून पाहत आहे. 'संजू सॅमसन हा प्रतिभावान खेळाडू आहे. आपण त्याला जेव्हा जेव्हा खेळताना पाहिलं आहे, त्यावेळी त्याने कौतुकास्पद कामगिरी करून दाखवली आहे. म्हणूनच चाहत्यांमध्येही संजू सॅमसनला पसंती आहे. परिस्थितीनुसार तो आपला खेळ बदलतो ही त्याची कला नक्कीच चांगली आहे. त्यामुळे अशा प्रतिभावान खेळाडूला संघात देण्याचा विचार नक्कीच केला जात आहे."
इशान किशनचं वाढलं टेन्शन
रोहित शर्माच्या या विधानामुळे त्याचा मुंबई इंडियन्सचा साथीदार इशान किशनला मात्र घाम फुटला असेल. कारण ऋषभ पंत हा भारताचा पहिल्या पसंतीची आणि अनुभवाच्या बाबतीत अव्वल यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्याच्यानंतर स्टँडबाय किपर म्हणून चाहते इशान किशनला पाहत होते. त्यामुळे टी२० वर्ल्ड कपसाठी संघात स्थान मिळवण्यासाठी इशानपुढे फारशी स्पर्धा नव्हती. पण रोहितने आज, संजू सॅमसन हा देखील यष्टीरक्षकांच्या शर्यतीत असल्याचं जाहीरपणे सांगितलं. संजू सॅमसन हा इशान किशनप्रमाणे यष्टीरक्षक तर आहेच. पण त्यासोबतच तो सलामीवीर किंवा मधली फळी अशा दोन्ही ठिकाणी फलंदाजी करण्यासही सक्षम आहे. त्यामुळे इशान किशनसाठी संजू सॅमसन हा एक चांगला पर्याय ठरू शकतो अशी चर्चा सुरू आहे.