मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत भारताला नामुष्कीचा पराभव पत्करावा लागला. वन डे मालिकेत तर ०-३ ने व्हाईटवॉश झाला. या पराभवानंतरही मास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर याने भारतीय संघ पुढील वर्षी होणाऱ्या वन डे विश्वचषकाचा विजेता बनेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.सचिनच्या मते वन डेमध्ये रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांची जोडी भारताची विश्वचषक जिंकण्याची प्रतीक्षा संपवतील. येत्या एप्रिल महिन्यात भारताच्या विजेतेपदाला ११ वर्षे पूर्ण होतील. ही दीर्घ प्रतीक्षा आहे. टीम इंडियाने आणखी एक विश्वचषक जिंकावा, अशी प्रत्येक क्रिकेट चाहत्याची इच्छा असल्याचे मत सचिनने एका चॅट शोमध्ये व्यक्त केले.
कर्णधार या नात्याने रोहितला फार थोडा अनुभव आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत तो पहिल्यांदा भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार असेल. राहुल द्रविड यांनादेखील टी-२० विश्वचषकानंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले होते. कर्णधार म्हणून रोहितने टी-२०त २२ पैकी १८ सामने जिंकून दिले तर चार गमावले. वन डेत त्याने दहा सामन्यात संघाचे नेतृत्व केले. त्यात आठ सामने जिंकले तर दोन सामने गमावले.
द्रविड-रोहितची जोडी शानदारn मास्टर ब्लास्टर सचिन म्हणाला, ‘विश्वचषक ती ट्रॉफी असते, ज्यासाठी प्रत्येक क्रिकेटपटू खेळत असतो. कोणत्याही खेळाडूसाठी यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीही नाही. टी-२० असो वा वन डे विश्वचषक असो विश्वचषक नेहमी ‘विशेष’ असतो. राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांची जोडी शानदार असल्याने ही जोडी देशाला विश्वचषक जिंकून देईल.’
n दोघेही शंभर टक्के योगदान देतील याची मला जाणीव आहे. १३५ कोटी भारतीय टीम इंडियासोबत आहेतच. योग्यवेळी चांगल्या गोष्टी जुळून आल्याचा मोठा लाभ होतो. द्रविडने भरपूर क्रिकेट खेळले आहे, त्याच्यात क्रिकेटचे ज्ञान ठासून भरले आहे. विश्वचषकाच्या वाटेत चढउतारही येतीलच, पण हिंमत हरायची नाही. सतत प्रयत्न करीत वाटचाल करावीच लागेल, असे अलीकडेच्या पराभवाबाबबत सचिनने खेळाडूंना दिलासा देताना सांगितले.