अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर -ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कर्णधार रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा-अक्षर पटेल यांनी भारतासाठी निर्णायक कामगिरी केली. यामध्ये आघाडीवर आहे तो रोहित. त्याने सर्व जबाबदारी खांद्यावर घेत कर्णधारास साजेशी खेळी केली. त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर सहज वर्चस्व गाजवले. त्याची खेळी महत्त्वाची ठरली, कारण भारताचे प्रमुख फलंदाज अपयशी ठरले. त्यामुळे रोहितही लवकर बाद झाला असता, तर भारताने ही पकड मिळवलीच नसती. विशेष म्हणजे रोहितकडून अशी खेळी पहिल्यांदाच झालेली नाही. त्याने याआधीही अशी भक्कम फलंदाजी केली आहे.
या खेळपट्टीवर फलंदाजी कठीण नाही, हे रोहितने दाखवून दिले. ऑस्ट्रेलियन फलंदाज आणि भारताचे प्रमुख फलंदाज नक्कीच या खेळपट्टीवर अपयशी ठरले. परंतु रोहित, जडेजा आणि अक्षर यांनी खेळपट्टीमध्ये काहीही खराब नसल्याचे सिद्ध केले. जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जबरदस्त पुनरागमन केले. अनेकांचे असे मत आहे की, जडेजा फिरकीपटू आहे, पण तो खरा अष्टपैलू आहे. त्याची फलंदाजी शैली वेगळीच आहे. त्याने भारताच्या भक्कम आघाडीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. भारताची फलंदाजी जितकी जास्त रंगेल, तेवढे जास्त दडपण ऑस्ट्रेलियावर येईल.
रोहितने भारताला योग्य दिशा दिली, जडेजाने भारताला विजयी मार्गावर आणले आणि अक्षरने भारताला हा मार्ग अधिक सुकर करून दिला. गोलंदाजीत अपेक्षित कामगिरी करू न शकल्याने त्याच्या निवडीवर प्रश्न निर्माण झाले. पण, अक्षरने फलंदाजीतून उत्तर दिले. तो प्रत्येक स्थितीत लढतो. त्याने कांगारूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. येथून भारताचा पराभव कठीण दिसतो.