IND vs WI: दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर भारताला लाजिरवाण्या पराभवांना सामोरं जावं लागलं. भारताने कसोटी मालिका गमावलीच पण नंतर वन डे मालिकेत संघाला व्हाईटवॉश मिळाला. आफ्रिका दौऱ्यावरून मायदेशी परतलेला संघ आता काही दिवसांतच विंडिजविरूद्ध मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघांमध्ये तीन वन डे आणि तीन टी२० सामन्यांच्या मालिका खेळल्या जाणार आहेत. भारताचा हिटमॅन रोहित शर्मा या मालिकेच्या माध्यमातून पुनरागमन करेलच. पण त्याच्यासोबतच आणखी एक स्टार खेळाडूही या मालिकेत 'कमबॅक' करणार असल्याची दाट शक्यता आहे.
६ फेब्रुवारीपासून विंडिजविरूद्धची मालिका सुरू होणार असल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) लवकरच भारताचा संघ जाहीर करण्याची शक्यता आहे. या संघात नवा कोरा कर्णधार रोहित शर्मा तर असेलच. पण त्याच्याबरोबरच अष्टपैलू रवींद्र जाडेजा यांचंही संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. रोहित आणि जाडेजाच्या पुनरागमनामुळे संघाला ऊर्जा आणि बळ मिळेल, असा सूर फॅन्समध्ये दिसून येत आहे.
शिखर धवनला दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. आपल्या ७१व्या शतकाच्या शोधात असलेल्या माजी कर्णधार विराट कोहलीवरही साऱ्यांची नजर असणारच आहे. श्रेयस अय्यरचा दक्षिण आफ्रिका दौरा अपेक्षेप्रमाणे झाला नाही. पण त्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. शार्दुल ठाकूरला गोलंदाजीत विशेष प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे त्याला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, जाडेजाच्या पुनरागमनामुळे रविचंद्रन अश्विनला वगळलं जाऊ शकतं.
वेगवान गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि दीपक चहर यांच्यावर असेल. भुवनेश्वर कुमारने आफ्रिका दौऱ्यावर निराश केल्याने त्याच्याऐवजी प्रसिध कृष्णा संघातील आपलं स्थान कायम राखण्याची शक्यता जास्त आहे. तसेच वॉशिंग्टन सुंदरही दुखापतीतून सावरून संघात येऊ शकतो.
वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, युझवेंद्र चहल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जाडेजा, प्रसिध कृष्णा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
Web Title: Rohit Sharma Ravindra Jadeja Likely to comeback in Team India for ODI T20 Series Against West Indies Ashwin Bhuvi can miss out
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.