India vs West Indies T20 Series: भारतीय संघ उद्यापासून वेस्ट इंडिजविरूद्ध टी२० मालिका खेळणार आहे. इडन गार्डन्सच्या मैदानावर तीन सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेआधी प्रथेप्रमाणे भारतीय कर्णधार Rohit Sharma याने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. रोहितचा Mumbai Indiansमधील माजी साथीदार Hardik Pandya याच्याबद्दलही रोहितने मत व्यक्त केलं. हार्दिक गेल्या वर्षीपर्यंत मुंबई संघाकडून खेळत होता, पण यंदा तो गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करणार आहे. भारतीय संघात मात्र अद्याप हार्दिकचे पुनरागमन झालेले नाही. त्याबद्दल रोहितने मत मांडलं.
"हार्दिक पांड्या हा असा खेळाडू आहे जो संघात असला तर तो तीनही गोष्टी चोख पार पाडू शकतो. तो उत्तम फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक आहे. त्यामुळे त्याचं संघातील स्थान खूप महत्त्वाचं असणार आहे. पण संघातील खेळाडूंची उपलब्धता हा खूप मोठा मुद्दा आहे. वर्ल्ड कपपासूनच आमच्या संघातील अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले. एकदा सर्वच्या सर्व खेळाडू तंदुरुस्त झाले की मग आम्हाला संघबांधणीचा नीट अंदाज घेता येईल", असं प्रतिक्रिया रोहितने व्यक्त केली.
विराट कोहलीच्या फॉर्मबद्दलही रोहितने मत मांडलं. "मिडियावाल्या लोकांनी जर त्याला सारखे प्रश्न विचारले नाहीत तर सगळ्या गोष्टी आपोआप सुधारतील. मी विराटला रोज भेटतोय आणि मला असं वाटतं की तो सध्या खूप चांगल्या मनस्थितीत असून आगामी क्रिकेट सामन्यांसाठी सकारात्मक विचार करतो आहे. गेल्या दहा वर्षांपेक्षाही अधिक काळ तो या भारतीय संघाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे दडपणाचे क्षण किंवा दबावाचे प्रसंग कशा पद्धतीने हाताळायचे हे त्याला नीट माहिती आहे", असं उत्तर रोहित शर्माने दिलं.