Join us  

Rohit Sharma on Virat Kohli Captaincy: रोहित पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाला, "विराटने चांगल्या पद्धतीने संघाचं कर्णधारपद पेललं, पण म्हणून..."

विराट-रोहित यांच्यातील वादाच्या चर्चा फॅन्ससाठी नवीन नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2022 2:49 PM

Open in App

Rohit Sharma on Virat Kohli Captaincy: भारताचा वन डे संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहित शर्माने आज पहिली पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्याने पहिल्या सामन्यात इशान किशन ओपनिंग करेल असं स्पष्ट केलं. विराट आणि रोहित यांच्यात वाद असल्याच्या चर्चा चाहत्यांसाठी काही नवीन नाहीत. त्यामुळे विराटबद्दल रोहितला काही प्रश्न विचारण्यात आले. त्याबाबत बोलताना रोहित म्हणाला की विराटने नक्कीच चांगल्या पद्धतीने कर्णधारपदाचं शिवधनुष्य पेललं. विराटचं संघातलं स्थान आणि 'रोहितपर्वा'त घडू शकणारे बदल याबाबत त्याने काही विधानं केली.

विराट कोहलीने कर्णधारपद सोडलं असलं तरी त्याचंही संघात विशेष महत्त्व असणार आहे, असं रोहित म्हणाला. "विराटने कर्णधार असताना ज्या गोष्टी केल्या, त्या चांगल्याच होत्या. पण याचा अर्थ असा नाही की मी नवीन कर्णधार असल्यामुळे त्या गोष्टी बदलल्या पाहिजेत. उलट सध्या काहीही बदल आणण्याची गरज नाहीये. भारताचा वन डे संघ हा खूपच चांगला आहे. जेव्हा विराट कोहली कर्णधार होता त्यावेळी मी त्या संघाचा उपकर्णधार होतो. त्यामुळे विराटने ज्या यशस्वी पद्धतीने नेतृत्व केलं त्याच प्रकारे मी देखील त्याचा वारसा पुढे सुरू ठेवेन. मी नेतृत्व करत असताना काही वेळा अशी परिस्थिती येईल जेव्हा आम्हाला थोडासा बदल करावा लागेल, त्यावेळी आम्ही नक्कीच बदलाचा विचार करू", असं रोहित म्हणाला.

"मी कायमच विविध प्रकारच्या नव्या गोष्टी करण्याच्या विचारांचा आहे. आमचं यावर अनेकदा बोलणंही झालं आहे. पण म्हणून मी संघात कर्णधार म्हणून आलो की आधीच्या कर्णधाराने केलेल्या गोष्टी अचानक बदलून टाकल्या पाहिजेत असं मूळीच नाही. मी खेळाडूंना फक्त इतकंच सांगेन की त्यांच्याकडून संघाला काय अपेक्षा आहेत", असं रोहितने स्पष्ट केलं.

"वन डे क्रिकेटमध्ये भारताची विजयाची टक्केवारी ७० टक्के आहे. त्यामुळे संघ म्हणून मोठे बदल गरजेचे नाहीत. प्रत्येकाला त्याच्या-त्याच्या भूमिका नीट माहिती आहेत. दुसऱ्या संघाना कॉपी करण्याची आम्हाला गरज नाही. आपला सेट अप वेगळा आहे. मी दृष्टीकोन बदलाच्या विरोधात कधीच नसतो. पण गरज असेल तरच ते बदल केले जावेत अशा मताचा मी आहे", असं रोहितने स्पष्ट केलं.

 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ
Open in App