Rohit Sharma on Virat Kohli Test Captain: विराट कोहलीने आपल्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर विविध चर्चांना उधाण आले. विराट आणि बीसीसीआयमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातही सारं काही अलबेल नसल्याच्या चर्चा होत्या. विराटने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहितने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. पण अखेर रविवारी त्याने सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या.
विराट कोहलीचा हा निर्णय क्रिकेट विश्वाला हादरवणारा होता. या निर्णयानंतर अनेकांनी ट्विटरवरून आपल्या भावना आणि मतं व्यक्त केली. सलामीवीर रोहित शर्माने मात्र ट्विटर ऐवजी इन्स्टाग्रामवरून विराटच्या या निर्णयाबद्दल आपलं मत व्यक्त केलं. रोहितने विराटसोबतचा स्वत:चा कसोटी क्रिकेट सामन्यातील एक फोटो पोस्ट केला आणि अवघ्या दोन ते तीन वाक्यात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. विराट कोहलीचा कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय हा अतिशय धक्कादायक असल्याचं रोहित शर्माने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. "विराटचा हा निर्णय धक्कादायक आहे. त्याने संघाचे नेतृत्व करताना जे यश संपादन केलं त्यासाठी त्याचे मनापासून अभिनंदन! भविष्यातील योजनांसाठी शुभेच्छा व सदिच्छा", अशी इन्स्टाग्राम पोस्ट रोहितने केली.
विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारतीय क्रिकेटमधील दोन बडे खेळाडू आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये वाद सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दोघांनीही वेळोवेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्यात मतभेद नसल्याचे सांगितलं आहे. पण काही दिवसांपूर्वी विराटने टी२० कर्णधारपद सोडलं आणि रोहितला कर्णधारपद देण्यात आलं. त्यानंतर विराटला अचानक वन डे संघाच्या कर्णधारपदावरून दूर करण्यात आलं. त्या जागी रोहितला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. आता दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा पराभव झाल्यानंतर विराटने कसोटी संघाचे कर्णधारपदही सोडलं. त्यामुळे आता तिन्ही फॉरमॅटमध्ये रोहित शर्मा कर्णधार असेल अशी चर्चा आहे.