नवी दिल्ली : टीम इंडियामध्ये येत्या काही महिन्यांत मोठा फेरबदल होणार आहे. सध्याचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 वर्ल्डकप नंतर वनडे आणि टी20 च्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याची शक्यता आहे. यानंतर सिक्सर किंग रोहित शर्माचा (Rohit Sharma) कप्तान बनण्याचा मार्ग मोकळा होईल. (Rohit Sharma May Be New Captain, After Virat Kohli's Resignation T20 World Cup.)
विराट कोहली (32) जो सध्या सर्वा प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कप्तान आहे, तसेच सर्वाधिक यशस्वी कर्णधार आहे. विराट कोहलीने रोहित शर्माकडे (34) भारतीय संघाची धुरा सोपविण्याचा निर्णय घेतल्याचे बीसीसीआयच्या सुत्राने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले आहे.
विराट कोहलीने गेल्या काही महिन्यांत रोहित शर्मा आणि टीम इंडियाच्या प्रशासनाशी दीर्घ काळ चर्चा केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाने विजय मिळविला त्यानंतर विराट पिता बनला त्यावेळी त्याने ही चर्चा केली आहे. यामुळे बीसीसीआयने देखील यावर विचार करण्यास सुरुवात केली असून तयारी देखील सुरु केली आहे.
काय आहे कारण...कसोटी, वन डे आणि 20-20 अशा तिन्ही प्रकारात कर्णधारपद सांभाळायचे असल्याने विराटच्या फलंदाजीवर त्याचा परिणाम जाणवत आहे. या तिन्ही प्रकाराता त्याच्या फलंदाजीला अधिक वेळ आणि वेग देण्याची गरज त्याला वाटत आहे. तसेच येत्या काळात 2022 आणि 2023 मध्ये भारतीय संगाला दोन वर्ल्ड कप खेळायचे आहेत. यामुळे विराटला त्याच्यावरील जबाबदारी कमी करायची आहे.
रोहितकडे सोपविण्याची योग्य वेळ?जर रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपविण्यात आले तर त्याच्या कामगिरीकडे पहावे लागेल. त्याने आयपीएलमध्ये 5 वेळा चषक जिंकला आहे. टी-20 मध्ये देखील कर्णधारपद भूषविले आहे आणि सामने जिंकले आहेत. यामुळे रोहितकडे कर्णधारपद देण्याची ही योग्य वेळ असल्याचे बीसीसीआय पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच रोहित आणि विराट यांचे चांगले जमते.