Rohit Sharma, Test Captain IND vs SL Test Series: भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा विराट कोहलीने राजीनामा दिल्यानंतर भारताचा नवा कर्णधार कोण असा प्रश्न साऱ्यांनाच पडला होता. त्या प्रश्नाचं उत्तर आज क्रिकेटचाहत्यांना मिळालं. भारतीय संघाच्या निवड समितीने टी२० आणि वन डे संघांनंतर आज कसोटी संघाच्या नेतृत्वाचा भारही रोहित शर्माच्या खांद्यावर सोपवला. भारत विरूद्ध श्रीलंका या कसोटी आणि टी२० मालिकेसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. श्रीलंकेच्या या दौऱ्यातील टी२० सामने लखनौ आणि धरमशाला येथे होणार आहेत. तर दोन कसोटी सामने अनुक्रमे मोहाली आणि बंगळुरू येथे होणार आहे.
श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी आणि टी२० मालिकेसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. कसोटी संघासाठी रोहित शर्माच्या नावाची कर्णधारपदी अधिकृत घोषणा करण्यात आली. कसोटी संघात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना संघातून वगळण्यात आले. तसेच, स्टँड बाय यष्टीरक्षक म्हणून संघात असणाऱ्या वृद्धिमान साहा आणि अनुभवी गोलंदाज इशांत शर्मालादेखील संघातून बाहेर करण्यात आले. या मालिकेच्या माध्यमातून अष्टपैलू रविंद्र जाडेजाचे संघात पुनरागमन होत असून यष्टीरक्षक केएस भरत, गोलंदाज सौरभ कुमार आणि फलंदाज प्रियांक पांचाळ यांना संधी देण्यात आली आहे.
भारताचा कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत, केएस भरत, रविंद्र जाडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार, रवि अश्विन (फिटनेस पाहून निर्णय घेणार)
टी२० मालिकेसाठी विराट, पंतला विश्रांती; लोकेश राहुल अजूनही अनफिट
श्रीलंकेविरूद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात विराट कोहली आणि ऋषभ पंत या दोघांना विश्रांती देण्यात आली आहे. इशान किशन आणि संजू सॅमसन यांच्यावर यष्टीरक्षणाची जबाबदारी असणार आहे. अष्टपैलू रविंद्र जाडेजाच्या कमबॅक मुळे व्यंकटेश अय्यरची संघातील जागा धोक्यात येऊ शकते. मात्र वेगवान अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर संघात नसल्याने जाडेजा आणि व्यंकटेश अय्यर दोघांना संघात एकत्र स्थान मिळते का, हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल. तसेच, विराट कोहलीच्या विश्रांतीमुळे ऋतुराज गायकवाडला अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी मिळण्याचीही शक्यता आहे.
भारताचा T20 संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, आवेश खान
भारत-श्रीलंका टी२० मालिका
२४ फेब्रुवारी - पहिली टी२० - लखनौ२६ फेब्रुवारी - दुसरी टी२० - धरमशाला२७ फेब्रुवारी - तिसरी टी२० - धरमशाला
भारत - श्रीलंका कसोटी मालिका
४ ते ८ मार्च - पहिली कसोटी - मोहाली१२ ते १६ मार्च - दुसरी कसोटी - बंगळुरू (डे नाईट टेस्ट)