IND vs AFG 1st T20I ( Marathi News ) : भारतीय संघाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात अफगाणिस्तानवर ६ विकेट्स राखून विजय मिळवला. अक्षर पटेल, मुकेश कुमार यांच्या प्रभावी कामगिरीनंतर शिवम दुबे, तिलक वर्मा, जितेश शर्मा व शुबमन गिल यांनी चांगली फलंदाजी केली. १ विकेट व नाबाद ६० धावा करणारा शिवम मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी ठरला. या सामन्यात ४२७ दिवसानंतर रोहित शर्मा ट्वेंटी-२० संघात परतला, परंतु तो दुसऱ्याच चेंडूवर रन आऊट झाल्याने चाहते निराश झाले. रन आऊट झाल्यानंतर रोहितचा पारा चढलेला दिसला आणि त्याने शुबमन गिलला चांगलेच सुनावल्याचे सर्वांनी पाहिले.
रोहित शर्मा २०२२ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर पहिल्यांदाच भारतासाठी ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळायला आला तेव्हा सर्व चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या षटकारांची अपेक्षा होती. पण रोहितचे नशीब खराब होते आणि गिलच्या गोंधळामुळे तो शून्यावर धावबाद झाला. धावबाद झाल्यानंतर रोहितला मैदानात राग आवरता आला नाही आणि तो गिलवर ओरडताना दिसला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता या घटनेवर रोहितने विधान केले आहे.
रन आऊट प्रसंगावर रोहित म्हणाला, अशा गोष्टी घडत असतात... पण, जेव्हा त्या तुमच्यासोबत घडतात, तेव्हा संताप येतो... तुम्हाला तिथे उभं राहायचं असतं आणि संघासाठी धावा करायच्या असतात. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होत नाही. आम्ही सामना जिंकलो, हे महत्त्वाचे आहे. शुबमन गिलने खेळपट्टीवर उभं राहून मोठी खेळी करावी, अशी माझी इच्छा होती. दुर्दैवाने चांगला खेळ करूनही त्याला माघारी यावे लागले.
रोहित शर्मा ( ०) आणि शुबमन गिल ( २३ ) बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या शिवम दुबेने ४० चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ६० धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाने १७.३ षटकांत ४ विकेट गमावून १५९ धावा करून सामना ६ विकेटने सहज जिंकला. आता मालिकेतील दुसरा सामना १४ जानेवारीला इंदूरमध्ये होणार आहे.
Web Title: Rohit Sharma reveals what went through his mind after getting run out for two-ball duck in T20I comeback
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.