रोहित शर्मानं ( Rohit Sharma) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. बीसीसीआयनं अधिकृतरित्या तशी माहिती दिली आहे. आफ्रिका दौऱ्यासाठी निवडलेल्या कसोटी संघातील सर्व खेळाडू मुंबईत दाखल झाले आहेत आणि आजपासून ते तीन दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये राहणार आहेत. पण, याआधी सराव सत्रादरम्यान रोहितला दुखापत झाली आणि त्यामुळेच त्याला माघार घ्यावी लागली आहे. त्याच्याजागी बीसीसीआयनं गुजरातचा फलंदाज प्रियांक पांचाळ ( Priyank Panchal) याची कसोटी संघात निवड केली आहे. रोहितची दुखापत किती गंभीर आहे, याचा अंदाज येत नाही. पण, तो वन डे मालिकेलाही मुकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
२०१९च्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकपासून रोहितचे कसोटीत सलामीला प्रमोशन झाले. त्यानंतर त्यानं १६ कसोटीत ५८.४८च्या सरासरीनं १४६२ धावा केल्या आहेत. त्यात पाच शतकांचा समावेश आहे. रोहित वन डे मालिकेला मुकल्यास लोकेश राहुल संघाचे नेतृत्व सांभाळेल.
पांचाळला यापूर्वीही इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघासोबत नेले होते. ३१ वर्षीय पांचाळ स्थानिक क्रिकेटमध्ये गुजरात संघाचे नेतृत्व सांभाळतो आणि इंग्लंड दौऱ्यावर अभिमन्यू इस्वरन याच्यासह तो राखीव खेळाडू म्हणून टीम इंडियासोबत होता. मागील काही वर्षांपासून तो भारत अ संघाचा नियमित सदस्य आहे. त्याच्याकडे १०० प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांचा अनुभव आहे. तो सध्या भारत अ संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे आणि तेथे त्यानं ९६, २४ व ० अशी तीन डावांत खेळी केली आहे. रणजी करंडक २०१६-१७च्या पर्वात पांचाळनं १७ डावांत ८७.३३च्या सरासरीनं १३१० धावा केल्या होत्या. त्याच पर्वात त्यानं पंजाबविरुद्ध नाबाद ३१४ धावांची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी केली होती. गुजरातनं तेव्हा जेतेपदही जिंकले होते.