India vs South Africa, 3rd day 3 Test Live Updates : ४ बाद ५८ अशा अवस्थेत असलेल्या टीम इंडियाला रिषभ पंत व विराट कोहली या जोडीनं सावरलं. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी विक्रमी ९४ धावांची भागीदारी केली आणि ही जोडी सॉलिड दिसत होती. पण, लुंगी एनगिडीनं घात केला अन् विराटला माघारी पाठवलं. बघता बघता भारताचे तळाचे फलंदाज माघारी जात होते, परंतु रिषभ पंत अखेरपर्यंत खेळपट्टीवर उभा राहिला. त्यानं १३९ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह नाबाद १०० धावा केल्या. जसप्रीत बुमराहच्या विकेटनं भारताच्या दुसऱ्या डावाचा शेवट झाला. रिषभ पंतच्या आजच्या खेळीचे रोहित शर्मा पासून ते सचिन तेंडुलकर या साऱ्यांनी कौतुक केलं.
- रिषभनं अर्धशतकी खेळी करताना मोठे विक्रम नोंदवले. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका येथे कसोटीत ५०+ धावा करणारा तो भारताचा तिसरा यष्टिरक्षक-फलंदाज ठरला. किरण मोरे आणि महेंद्रसिंग धोनी यांनाच हा विक्रम करता आला आहे.
- परदेशातील कसोटीतील ही त्याची सहावी ५०+ खेळी ठरली आणि भारताकडून सर्वाधिक ५०+ धाव करणाऱ्या यष्टिरक्षक- फलंदाजांत त्यानं सय्यद किरमानी ( ५) यांचा विक्रम मोडला. धोनी ( १९), फारूख इंजिनियर ( ८) व किरण मोरे ( ८) हे आता आघाडीवर आहेत.
- दक्षिण आफ्रिकेत एकाच कसोटी डावात दोन किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. शिवाय त्यानं आफ्रिकेत कसोटी डावात सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या भारतीय यष्टिरक्षक-फलंदाजाचा विक्रम नावावर केला.
- २०१०मध्ये महेंद्रसिंग धोनीनं सेंच्युरियन कसोटीत ९० धावा केल्या होत्या आणि रिषभनं तो विक्रम आज मोडला. दक्षिण आफ्रिकेत शतक झळकावणारा तो पहिला आशियाई यष्टिरक्षक फलंदाज ठरला आहे.
रिषभ पंतच्या या कामगिरीचे साऱ्यांनी कौतुक केले...