Hardik Pandya Injury : बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला झालेल्या दुखापतीने सर्वांची चिंता वाढवली आहे. भारताने हा सामना ७ विकेट्सने जिंकला आणि विजयाचा चौकार खेचला. या सामन्यात ९व्या षटकात तीन चेंडू टाकल्यानंतर हार्दिकचा पाय मुरगळला आणि त्याला मैदान सोडावे लागले. त्यानंतर त्याला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
स्कॅन केल्यानंतर हार्दिक परतला, परंतु खेळला नाही. तो भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये बसलेला दिसला. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सहाय्यक स्टाफ काहीतरी गंभीर चर्चा करताना दिसले. रोहित बाद होऊन माघारी आल्यानंतर तोही या चर्चेत सहभागी झाला. त्यामुळे हार्दिकची दुखापत गंभीर असल्याची चिंता वाटू लागली. सामन्यानंतर शुबमन गिलने आपल्याला दुखापतीबाबत माहीत नसल्याचे सांगितले.
रोहितने नंतर अपडेट्स दिले. तो म्हणाला, हा एक चांगला विजय होता. ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. आमची सुरुवात चांगली झाली नाही पण मधल्या टप्प्यात आणि अखेरच्या टप्प्यात ती चांगली खेचली. आमचचे क्षेत्ररक्षण शानदार होते .हार्दिकचा पाय थोडासा दुखत होता. कोणतेही मोठे नुकसान नाही, ते आमच्यासाठी चांगले आहे. पण साहजिकच अशा दुखापतीमुळे आम्हाला दररोज मूल्यांकन करावे लागेल आणि आम्ही जे काही लागेल ते करू.