इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज एलिमिनेटर सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (LSG vs MI) यांच्यात खेळला जाईल. या सामन्यात जो संघ हरेल तो स्पर्धेतून बाहेर जाईल, तर विजयी संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सशी भिडणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी कॅप्टन रोहित शर्माने जिओ सिनेमाला मुलाखत दिली होती. ज्यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबाबत मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की त्याच्यासाठी फक्त त्याचे कुटुंब, मित्र आणि सहकारी यांचे मत महत्त्वाचे आहे. इतर माझ्याबद्दल काय बोलतात याची मला पर्वा नाही. ते ट्रोल करणाऱ्यांबद्दल विचार करण्यात वेळ वाया घालवण्याची गरज नाही. मी गेल्या १५ वर्षांत सर्वकाही पाहिले आहे.
२०११च्या वर्ल्ड कप स्पर्धेबद्दल रोहित शर्मा म्हणाला की, वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान संघाचा भाग नसणे हा माझ्यासाठी मोठा धक्का होता. मी इतर कोणावरही दोष देऊ शकत नाही. त्या काळात मी खेळ, योग, ध्यान याद्वारे स्वत:ला बळकट केले. त्याचा मला फायदा झाला.
आयपीएलमध्ये सर्वाधिक पाच जेतेपदं मुंबई इंडियन्सच्या नावावर आहेत. पण, ही जेतेपदं जिंकणं तितकं सोपं नव्हतं, असं MI चा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला. आयपीएलचा प्रत्येक हंगाम हा नवा असतो आणि तुम्हाला पहिल्यापासूनच सुरुवात करावी लागते. मुंबई इंडियन्सने अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आणि त्यापैकी बरेच खेळाडू भारतासाठीही खेळले. यामागे संघाच्या स्काऊटिंग टीमचा खूप मोठा वाटा आहे, असेही रोहित म्हणाला.