लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : यंदा फलंदाजीमध्ये मी अपेक्षित कामगिरी करू शकलो नाही; पण यंदाच्या निराशाजनक सत्रामुळे झोपही गायब झाली नाही. खेळामध्ये काही बदल करून नक्कीच दमदार पुनरागमन करेन, असा विश्वास मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने शनिवारी व्यक्त केला.
२००८ साली आयपीएल पदार्पण केल्यानंतर पहिल्यांदाच रोहितला एका सत्रात एकही अर्धशतक झळकावता आले नाही. रोहितने यंदाच्या सत्रात १४ सामन्यांमध्ये १२०.१७ च्या स्ट्राईक रेटने केवळ २४८ धावाच केल्या.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयानंतर रोहित म्हणाला की, अनेक निर्धारित गोष्टी करण्यात मला अपयश आले. यंदाच्या माझ्या कामगिरीने मी निराश आहे. त्यामुळे ही स्थिती पहिल्यांदाच उद्भवलेली नाही. मला जाणीव आहे की, क्रिकेट येथेच संपलेले नाही.
रोहित पुढे म्हणाला की, पुढेही आम्हाला बरेच खेळायचे आहे. त्यामुळे मला मानसिकरीत्या कणखर होऊन दमदार पुनरागमन करायचे आहे. आता मला काही बदल करावे लागतील आणि जसा वेळ मिळेल तेव्हा यावर काम करावे लागेल.