India vs Australia ODI Series : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या वन डे सामन्यात भारताचा दारुण पराभव केला. विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने १० विकेट्स व २३४ चेंडू राखून विजय मिळवला. या सामन्यात भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही खराब झाली. भारताचा संपूर्ण संघ ११७ धावांत तंबूत परतला अन् ऑस्ट्रेलियाने ११ षटकांत हे लक्ष्य पार करून इतिहास घडविला. भारताचा हा ( सर्वाधिक चेंडू राखून) सर्वात लाजीरवाणा पराभव ठरला. ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्माला ( Rohit Sharma) जलदगती जसप्रीत बुमराहबद्दल विचारण्यात आले, ज्यावर त्याने मोठं विधान केलं.
मग बोलू नका की पुरेशी संधी नाही मिळाली! सूर्यकुमारचं नाव घेत रोहित शर्मा हे काय म्हणाला?
दुखापतीमुळे बुमराह बराच काळ संघाबाहेर आहे. तो भारताकडून शेवटचा सप्टेंबर २०२२ मध्ये खेळला होता. त्याच वेळी, गेल्या वर्षी जुलैमध्ये तो शेवटचा वनडे खेळला होता. त्याच्या अनुपस्थितीत अनेक युवा खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत बुमराहबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना कर्णधार रोहित म्हणाला की, संघाला त्याच्याशिवाय खेळण्याची सवय झाली आहे.
भारतीय कर्णधाराने पत्रकार परिषदेत सांगितले की,''आम्ही त्याच्याबद्दल विचार करू शकत नाही. बुमराह आठ महिन्यांहून अधिक काळ संघात नाही. पण आता संघ आणि खेळाडूंना त्याची सवय झाली आहे. बुमराह हा चांगला गोलंदाज आहे आणि कोणत्याही गोलंदाजाला त्याची उणीव भरून काढणे अवघड आहे. पण आता तो अजिबात उपलब्ध नाही, त्यामुळे त्याचा विचार करण्यात अर्थ नाही. आता पुढे जायचे आहे. मला वाटते बुमराहच्या अनुपस्थितीत सिराज, शमी, शार्दूल यांनी चांगली कामगिरी केली आहे. तसेच आमच्याकडे उम्रान मलिक आणि उनाडकट आहेत. त्यांच्यातही भरपूर क्षमता आहे.''
बुमराहच्या पाठीवर नुकतीच न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे तो बराच काळ क्रिकेटपासून दूर राहणार आहे. यादरम्यान तो आयपीएल आणि आशिया कपमधूनही बाहेर राहणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"