भारतीय क्रिकेट नियमाक मंडळानं ( BCCI) बुधवारी टीम इंडियाच्या वन डे संघाच्या कर्णधारपदावर रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) निवडीची घोषणा केली. यापुढे ट्वेंटी-२० व वन डे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी ही रोहितच्या खांद्यावर असणार आहे. विराट कोहलीकडे ( Virat Kohli) केवळ कसोटी संघाचे नेतृत्व असणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी बीसीसीआयनं टाकलेल्या या गुगलीनं सारेच चक्रावले आहेत. पण, रोहित शर्माचं त्याच्यावरील जबाबदारीबाबत स्पष्ट मत आहे आणि आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन त्यानं त्याची कर्णधारपदाची फिलोसॉफी स्पष्ट केली आहे.
backstage with Boria Majumdar या यू ट्यूब चॅनेलवर रोहितनं त्याच्यावरील जबाबदारीबाबत स्पष्ट मत व्यक्त केलं. तो म्हणाला,''आगामी वर्ल्ड कप हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यादृष्टीनं आतापासूनच कामाला लागायला हवं. जेव्हा मोठ्या स्पर्धेत खेळता तेव्हा खेळाडूंवर प्रचंड दडपण असतं. त्यासाठी आतापासूनच खेळाडूंना तयार करायला हवं. त्यांना मुक्तपणे खेळण्याची संधी द्यायला हवी. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी २०-२५ सामने खेळणार आहोत आणि त्यातून आम्हाला नेमकं काय करायला हवं, याचा अंदाज येईल.''
''माझ्यामते कर्णधारानं स्वतःपेक्षा संघाला पुढे ठेवायला हवं. पण, कामगिरीबद्दल म्हणायचं तर कर्णधारानं पुढे राहायला हवं. पण, संघाच्या मागे ठामपणे उभं राहुन सर्व खेळाडूंमध्ये विश्वास निर्माण करायला हवा. खेळाडूंना मुक्तपणे खेळण्यास सांगायलं हवं, पण त्याचवेळी काय करू नये हेही सांगायला हवं. प्लेइंग इलेव्हनमध्ये योग्य खेळाडू घेऊन खेळणं, त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणे आणि ऑफ फिल्ड योग्य निर्णय घेणे, हे कर्णधाराचे प्रमुख काम आहे,''असे रोहितनं यावेळी सांगितले.
कर्णधार म्हणून माझी भूमिका ही मैदानावर २० टक्के राहणार आहे आणि मैदानाबाहेर ८० टक्के, असेही तो म्हणाला. विराट कोहलीबद्दल रोहित म्हणाला,''विराट कोहलीसारखा कौशल्यपूर्ण फलंदाज भारतीय संघाला नेहमीच हवा. तो या संघाचा लिडरही आहे. त्यानं संघाची ताकद अधिक वाढणार आहे.''
पाहा व्हिडीओ...