Rohit Sharma News : भारत आणि आयर्लंड यांच्यात आज सामना होत आहे. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मधील आपला सलामीचा सामना भारतीय संघ आयर्लंडविरूद्ध खेळत आहे. या सामन्याच्या तोंडावर कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेत विविध बाबींवर प्रकाश टाकला. नेहमीप्रमाणे यावेळी देखील रोहितने एका प्रश्नावर व्यक्त होताना पत्रकाराची फिरकी घेतली. रोहितचे उत्तर ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
ट्वेंटी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाने न्यूयॉर्कमध्ये बांगलादेशविरुद्ध एकमेव सराव सामना खेळला होता. या सामन्यादरम्यान रोहित शर्माचा एक चाहता सुरक्षा रक्षकांना चकमा देऊन थेट मैदानात शिरला. यावर पत्रकाराने एक प्रश्न विचारला, ज्यावर रोहित शर्मा म्हणाला की हा प्रश्न योग्य नाही.
"सराव सामन्यादरम्यान अचानक एक चाहता मैदानात आला. ज्या प्रकारे सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडले, ते पाहून तू त्यांना सांभाळून घ्या अशी विनंती केल्याचे दिसले. त्यावेळी तुझ्या भावना काय होत्या?", या प्रश्नावर रोहितने म्हटले की, सर्वप्रथम मी म्हणेन की अशा पद्धतीने मैदानात कोणीही प्रवेश करू नये. हे बरोबर नाही आणि प्रश्नही योग्य नव्हता कारण मैदानावर कोण धावत येत आहे या गोष्टींना आम्हाला प्राधान्य द्यायचे नाही, त्याचा प्रचार करायचा नाही. मला वाटते की खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची आहे, त्याचप्रमाणे बाहेरील लोकांची सुरक्षा देखील महत्त्वाची आहे. आम्ही क्रिकेट खेळतो. होय, पण बाहेर बसलेल्या लोकांना प्रत्येक देशाचे स्वतःचे नियम आणि कायदे असतात हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यांचे पालन करणे आणि समजून घेणे खूप महत्वाचे आहे. मी एवढेच सांगू शकतो आणखी काय सांगू?
विश्वचषकासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद.
विश्वचषकातील भारताचे सामने -५ जून - भारत विरूद्ध आयर्लंड, न्यूयॉर्क९ जून - भारत विरूद्ध पाकिस्तान. न्यूयॉर्क१२ जून - विरूद्ध अमेरिका, न्यूयॉर्क१५ जून - विरूद्ध कॅनडा, फ्लोरिडा