Rohit Sharma reaction on Series Loss, IND vs SL: टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या पहिल्याच क्रिकेट मालिकेत भारताचा लाजिरवाणा पराभव झाला. भारतीय संघाचा श्रीलंकेविरूद्धच्या वनडे मालिकेत २-० असा पराभव झाला. पहिला सामना बरोबरीत सुटल्यानंतर दुसरा सामना श्रीलंकेने ३२ धावांनी जिंकला होता. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी अतिशय वाईट कामगिरी केल्याने टीम इंडियाला ११० धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला. अविष्का फर्नांडोच्या ९६ धावांच्या बळावर श्रीलंकेने ७ बाद २४८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा संपूर्ण डाव १३८ धावांतच गुंडाळला गेला. रोहितने या मालिकेत दोन अर्धशतके केली, पण संघाला विजय मिळवून देता आला नाही. या पराभवानंतर रोहितने प्रतिक्रिया दिली.
"आम्ही वैयक्तिक स्तरावर जे प्लॅनिंग केले, त्यात काही ठिकाणी आम्ही फसलो. समोरच्या संघाने आम्हाला दबावाखाली ठेवण्यात यश मिळवले. टी२० जिंकून आल्यानंतर अशा प्रकारचा पराभव होणे हे नक्कीच दुःखदायक आहे, पण चांगल्या गोष्टींचे श्रेय त्या-त्या वेळी दिले गेलेच पाहिजे. श्रीलंकन संघ आमच्यापेक्षा नक्कीच सर्वोत्तम खेळ केला," असे रोहित म्हणाला.
सकारात्मक गोष्टीही घडल्या...
रोहित पुढे म्हणाला, "आम्ही पिचची कंडिशन पाहून संघात जास्त स्पिनर खेळवण्याचा निर्णय घेतला होता. पण आमच्याकडून त्याचा पुरेपूर फायदा घेण्यात आला नाही. संपूर्ण सिरीज मध्येच आमची कामगिरी चांगली झाली नाही. त्यामुळे आम्हाला मालिका पराभवाला सामोरे जावे लागले. मालिका जरी पराभूत झालो असलो तरी यात काही सकारात्मक गोष्टीही घडल्या. स्पिनर्सनी उत्तम गोलंदाजी केली मधल्या फळीतील फलंदाजही काही अंशी प्रभावी ठरले. पण सिरीज हरलो, त्यामुळे सकारात्मक गोष्टींपेक्षाही आमचं काय चुकलं हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. अशा प्रकारच्या पिचवर कसा खेळायचं याचा पुढच्या वेळेस नक्कीच अधिक अभ्यास करून येणे गरजेचे आहे."
मालिका हरली म्हणून जग संपत नाही...
"मालिका हरली म्हणून जग संपलं असं होत नाही. आमच्या संघातील सर्व खेळाडू अतिशय उत्तम आणि प्रतिभावान आहेत. हे खेळाडू गेली कित्येक महिने उत्तम क्रिकेट खेळत आहेत. त्यांनी विविध आव्हानांचा सामना करून स्वत:ला सिद्ध करून दाखवलं आहे. त्यामुळे एखादी मालिका हरल्यास फारसा फरक पडणार नाही. मालिकेतील पराभव ही फार मोठी चिंतेची बाब नाही, पण या पराभवाकडे गांभीर्याने नक्कीच पाहिले पाहिजे," ही बाब रोहितने अधोरेखित केली.