वन डे वर्ल्ड कप २०२३ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला विराट कोहली ( Virat Kohli) इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. २०२२च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर विराट मर्यादित षटकांच्या क्रिकेट फॉरमॅटपासून दूर आहे आणि त्यामुळेच आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये त्याला खेळवायचे की नाही, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विराट ट्वेंटी-२० संघात फिट बसत नसल्याची चर्चा BCCI मध्ये सुरू आहे.
भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघातून विराटच्या संभाव्य वगळल्याचा अहवाल या आठवड्याच्या सुरुवातीला द टेलीग्राफने वृत्त दिल्यानंतर वणव्यासारखा पसरला होता, परंतु भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू कीर्ती आझाद यांच्या ताज्या पोस्टने या सर्व दाव्यांचे खंडन केले आहे. १९८३ च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडूने असे म्हटले की, विराट कोहली कोणत्याही किंमतीत विराट ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात हवाय, असे कर्णधार रोहित शर्माने बीसीसीआय सचिव जय शाह यांना सांगितले आहे.
किर्ती आझाद यांनी ट्विट केले की,''निवडकर्ते नसूनही जय शाह यांनी अजित आगरकरला इतर निवडकर्त्यांशी बोलून विराट कोहलीला ट्वेंटी-२० संघात स्थान मिळत नाही हे पटवून देण्याची जबाबदारी दिली आहे. यासाठी त्याला १५ मार्चपर्यंतची मुदत दिली गेली होती. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, अजित आगरकर ना स्वत:ला पटवून देऊ शकला ना इतर निवडकर्त्यांना. जय शाहने मग रोहित शर्मालाही विचारले, पण, रोहित म्हणाला की, आम्हाला विराट कोहलीची कोणत्याही किंमतीत गरज आहे. विराट कोहली ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार असून संघ निवडीपूर्वी त्याची अधिकृत घोषणा केली जाईल.