Rohit Sharma News : न्यूझीलंड क्रिकेट संघाने तब्बल ३६ वर्षांनंतर भारतात कसोटी सामना जिंकला. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारताला तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना मोठ्या फरकाने गमवावा लागला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया पहिल्या डावात अवघ्या ४६ धावांत गडगडली. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा असल्याचे कर्णधार रोहित शर्माने नमूद केले. न्यूझीलंडच्या संघाने पहिल्याच डावात मोठी धावसंख्या उभारल्याने त्यांचा विजय सोपा झाला. पाहुण्या संघाने पहिल्या डावात ४०२ धावा कुटल्या होत्या. लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहितने विविध बाबींवर प्रकाश टाकला.
१०७ धावांचे लक्ष्य सोपे होते मात्र याचा बचाव करण्यासाठी आम्ही शक्य ते सर्वकाही केले. पण, हा सामना आमच्यासाठी जिंकण्यासारखा नव्हता. आम्ही केलेल्या काही चुकांचे परिणाम भोगावे लागले. याआधी देखील आम्ही अशा परिस्थितीचा सामना केला असून पुनरागमन कसे करायचे हे आम्हाला ठाऊक आहे. त्याच उद्देशाने पुढच्या सामन्यात उतरू... पहिल्या दिवशी आमच्या योजनेनुसार काहीच झाले नाही. आम्ही केवळ ४६ धावा करू शकल्याने न्यूझीलंडला मोठी आघाडी घेता आली, असे रोहित शर्माने माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ८ गडी राखून पराभव केला. सामन्याच्या पाचव्या दिवशी किवी संघाला विजयासाठी अवघ्या १०७ धावा करायच्या होत्या. मग न्यूझीलंडने दोन गडी गमावून हे लक्ष्य गाठले. शेवटच्या दिवशी रचिन रवींद्र आणि विल यंग यांच्यातील ७२ धावांच्या भागीदारीने टीम इंडियाचा पराभव निश्चित केला. सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताकडून बळी घेणारा एकमेव गोलंदाज जसप्रीत बुमराह ठरला, त्याने २ फलंदाजांना बाद केले. न्यूझीलंडने ३६ वर्षांनंतर भारतात कसोटी सामना जिंकला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने पहिल्या डावात अवघ्या ४६ धावा केल्या. पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या ४६ धावांत गडगडली. मग न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात ४०२ धावा करुन यजमानांची कोंडी केली. दुसऱ्या डावात भारताने सर्वबाद ४६२ धावा केल्याने टीम इंडियाला १०६ धावांची आघाडी मिळाली. मोठी आघाडी न मिळाल्याने भारतीय गोलंदाजांना लढण्याची संधीच मिळाली नाही.