केपटाउन: कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात छोटा सामना म्हणून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या सामन्याची ओळख झाली आहे. अवघ्या दीड दिवसात सामना जिंकून मालिका बरोबरीत संपवण्याचे आव्हान भारतीय संघाने पूर्ण केले. सामन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच बुधवारी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला केवळ ५५ धावा करता आल्या. मोहम्मद सिराजचे वादळ आले अन् यजमान संघ धुवून निघाला. प्रत्युत्तरात, भारताने आपल्या पहिल्या डावात १५३ धावा करून ९८ धावांची आघाडी घेतली. विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने यजमान संघाच्या खेळीला दाद दिली.
यजमान संघाप्रमाणे भारताला देखील आपल्या पहिल्या डावात संघर्ष करावा लागला. लक्षणीय बाब म्हणजे भारताचे सहा फलंदाज सलग शून्यावर बाद होत गेले. १५३ धावांवर ४ बाद असताना याच धावसंख्येवर भारतीय संघ सर्वबाद झाला. दिवसाच्या तिसऱ्या सत्रात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी आपल्या दुसऱ्या डावात ३ गडी गमावून ६२ धावा केल्या होत्या. आफ्रिकेचा संघ आपल्या दुसऱ्या डावात १७६ धावांत आटोपला. एडम मार्करमच्या (१०६) शतकी खेळीच्या जोरावर आफ्रिकेने १५० पार धावसंख्या नेली. भारताकडे ९८ धावांची आघाडी असल्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी केवळ ७९ धावांची गरज होती.
सामन्यानंतर बोलताना भारतीय कर्णधार रोहित शर्माने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. रोहित म्हणाला, "दुसरा सामना जिंकल्याचे समाधान आहेच... पण मालिका जिंकली असती तर नक्कीच आनंद झाला असता. मात्र, आपल्याला एक गोष्ट मान्य करावी लागेल की दक्षिण आफ्रिका हा एक महान संघ आहे. आम्हाला कसोटी मालिका जिंकायला आवडली असती पण तसे झाले नाही."
भारताचा मोठाविजयमोहम्मद सिराज (१५-६) व जसप्रीत बुमराह (६-६१) यांनी अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या डावात उल्लेखनीय मारा करून विजयाचा पाया रचला. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांवर आणि दुसरा डाव १७६ धावांवर भारतीय गोलंदाजांनी गुंडाळला. दुसऱ्या डावात त्याच्यांकडून एडन मार्करमने शतकी खेळी केली. भारताकडून पहिल्या डावात रोहित शर्मा (३९), शुबमन गिल (३६) व विराट कोहली (४६) वगळल्यास अन्य फलंदाज अपयशी ठरले. भारताचा पहिला डाव १५३ असा गडगडला आणि ९८ धावांच्या आघाडीवर समाधान मानावे लागले. भारताकडून दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल (२८), विराट कोहली (१२), शुबमन गिल (१०) व रोहित शर्मा (नाबाद १७) यांनी हातभार लावला अन् भारताने १२ षटकांत ३ बाद ८० धावा करून विजय मिळवला.