Rohit Sharma Toss IND vs SL 2nd ODI Live: भारतीय संघाने तीन वन डे सामन्यातील पहिला सामना जिंकला. आज दुसरा सामना कोलकाता येथे रंगला आहे. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्माने टीम इंडियामध्ये एक महत्त्वाचा बदल केला असून कुलदीप यादवला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याच्या जागी दुखापतग्रस्त असलेल्या युजवेंद्र चहलला संघाबाहेर बसवण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रोहित शर्मा जेव्हा टॉस हरला, त्यावेळी त्याने आनंद व्यक्त केला. त्याचे कारणही त्याने सांगितले.
"आम्हाला गोलंदाजी करायची आहे यात मला काहीच अडचण नाही. कारण मी जेव्हा टॉससाठी आलो त्यावेळी मी माझी द्विधा मनस्थिती होती. कारण गेल्या वेळी आम्ही ज्या प्रकारची फलंदाजी केली, त्यावरून मला असं वाटत होतं की मी फलंदाजी करावी. पण हे मैदान आणि ही खेळपट्टी पाहता प्रथम गोलंदाजी करणे हे मला जास्त इष्ट वाटत आहे. त्यामुळे आता मला असं वाटतंय की मी टॉस जिंकला याचा मला आनंदच वाटला पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही द्विधा मनस्थितीमध्ये असता तेव्हा टॉस हरणं हे केव्हाही चांगलं असतं", असं रोहित शर्मा म्हणाला.
युजवेंद्र चहलच्या दुखापतीबाबतही त्याने माहिती दिली. "आम्ही पहिला सामना अतिशय चांगल्या पद्धतीने जिंकलो. पण तरीही आम्हाला आमच्या संघात नाईलाजाने एक बदल करावा लागला. आमचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल याने गेल्या सामन्यात फिल्डिंग करताना त्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला आम्ही विश्रांती दिली आहे. त्याच्या जागी कुलदीप यादवला संघात स्थान देण्यात आले आहे," असेही रोहित शर्मा म्हणाला.
भारताचा संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, उमरान मलिक, मोहम्मद सिराज
श्रीलंकेचा संघ- अविष्का फर्नांडो, नुवान फर्नांडो, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), चरिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, लाहिरू कुमारा, कसून राजिथा