Rohit Sharma Test Captain : भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा खूपच सुमार ठरला. कसोटी मालिकेत भारताचा २-१ असा पराभव झाल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) ने तडकाफडकी कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर आता नवा कर्णधार कोण, याची उत्सुकता साऱ्यांनाच होती. रोहित शर्मा, लोकेश राहुल, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह या चौघांच्या नावांची चर्चा सुरू होती. अखेर आज रोहितच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. श्रीलंकेविरूद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील १८ खेळाडूंच्या भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. निवड समितीचे अध्यक्ष Chetan Sharma यांनी भारताच्या कसोटी आणि टी२० संघांची घोषणा केली.
विराटनंतर कर्णधारपद रोहितकडेच का सोपवलं असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी रोहितला कर्णधार म्हणून निवडण्याचं कारण सांगितलं. "रोहित शर्मा हा सध्याच्या घडीला भारताचा पहिल्या क्रमांकाचा क्रिकेटपटू आहे. रोहित एकदम फिट आहे. जेव्हा रोहितसारखा बडा खेळाडू टीम इंडियाचा कर्णधार बनतो तेव्हा क्रिकेट संघाची प्रगती जलदगतीने होते आणि संघाचा पुढील मार्ग अधिक सुकर होतो. म्हणूनच रोहितला कसोटी संघाचेही कर्णधारपद सोपवण्यात आले आहे", असे कारण चेतन शर्मा यांनी दिले.
श्रीलंकेविरूद्धच्या आगामी कसोटी संघातून चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोन अनुभवी खेळाडूंचा डच्चू देण्यात आला. तसेच, स्टँड बाय यष्टीरक्षक म्हणून संघात असणारा वृद्धिमान साहा आणि अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा यांचीही संघातून हकालपट्टी करण्यात आली. या मालिकेच्या माध्यमातून अष्टपैलू रविंद्र जाडेजाचे संघात पुनरागमन होत आहे. तसेच साहाच्या जागी यष्टीरक्षक केएस भरत तर इशांतच्या जागी गोलंदाज सौरभ कुमारला संधी मिळाली आहे. त्याशिवाय, फलंदाज प्रियांक पांचाळ यालाही संघात संधी देण्यात आली आहे.
भारताचा कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत, केएस भरत, रविंद्र जाडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार, रवि अश्विन (फिटनेस पाहून निर्णय घेणार)