मोठ्या ब्रेकनंतर भारतीय संघ पुन्हा एकदा नव्या मालिकेसाठी सज्ज होतोय. १२ सप्टेंबरला भारतीय संघातील सर्व सदस्य चेन्नईमध्ये एकत्रित येणार आहेत. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ सप्टेंबरपासून भारतीय संघ बांगलादेश विरुद्धच्या कसोटीनं दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात करेल.
रोहित शर्मानं शेअर केला फिटनेस ट्रेनिंगचा खास व्हिडिओ
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या एम चिदम्बरम स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं या मालिकेसाठी आधीच जोरदार तयारी सुरु केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता रोहित शर्मानं आपल्या फिटनेस ट्रेनिंगचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडिओमध्ये एक खास ट्विस्टही पाहायला मिळते. कारण त्याने वर्कआउटच्या खास व्हिडिओमध्ये काही मजा मस्ती करतानाचे क्षणही जोडले आहेत.
वर्कआउट सेशन अन् त्यातील खास ट्विस्ट
रोहित शर्मानं या व्हिडिओला खास कॅप्शन दिले आहे. जे अधिक लक्षवेधी ठरताना दिसते. "९९ टक्के वेळ हा वर्कआउटमध्ये जातो. उरलेल्या एक टक्का हा असा असतो" असे म्हणत त्याने काही मजेशीर क्षण या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केले आहेत.
काही देशांतर्गत क्रिकेट खेळले, तर मोजक्या मंडळींनी फिटनेसवर फोकस दिला
भारतीय संघाने श्रीलंका दौऱ्यावरीलत ३ सामन्यांच्या वनडे मालिकेनंतर जवळपास ४३ दिवस एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिके आधी बहुतांश खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमधील दुलिप करंडक स्पर्धेत सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे देशांतर्गत क्रिकेटमधून दूर राहिलेल्या मंडळींनी फिटनेसवर भर देत बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेची तयारी केल्याचे दिसते. ज्यात रोहित शर्मासह विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहचा समावेश होतो.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दृष्टिने बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका महत्त्वाची
बांगलादेशविरुद्धचा कसोटी मालिकेत दमदार कामगिरीसह भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची दावेदारी आणखी भक्कम करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. सध्याच्या घडीला भारतीय संघ या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहे. याआधीच्या दोन्ही हंगामातही भारतीय संघाने फायनल खेळली. पण चांदीची गदा काही हाती आली नाही. फायनलमधील पराभवाची मालिका खंडीत करून रोहित शर्मा आणखी एक आयसीसी ट्रॉफी आपल्या नावे करण्यासाठी उत्सुक असेल.