Rohit Sharma Hardik Pandya Mumbai Indians: सलग तीन सामने हरल्यानंतर अखेर मुंबई इंडियन्सच्या संघाने IPL 2024 मधील आपला पहिला सामना जिंकला. मुंबईच्या संघाकडून रोहित शर्मा, टीम डेव्हिड आणि इशान किशन यांनी दमदार खेळी केल्या. पण रोमारियो शेपर्डने सामन्याचा मूड बदलून टाकला. त्याने शेवटच्या षटकात ३२ धावा कुटल्या. त्यामुळे मुंबईने २३४ पर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना त्रिस्टन स्टब्सने २५ चेंडूत नाबाद ७१ धावा केल्या. पण दिल्लीला २०५ धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबई इंडियन्सने २९ धावांनी सामना जिंकला आणि २ गुणांसह गुणतालिकेत आपले खाते उघडले. सामना विजयानंतर रोहित शर्माने एक पोस्ट केली, ज्याची सध्या चर्चा रंगली आहे.
मुंबई इंडियन्सला पाच वेळा विजेतेपदाची ट्रॉफी मिळवून देणाऱ्या रोहित शर्माला संघाने कर्णधारपदावरून हटवले. त्याच्या जागी यंदा हार्दिक पांड्याला संघाचे नेतृत्व देण्यात आले. हार्दिकच्या नेतृत्वात मुंबईने पराभवाची हॅटट्रिक केली होती. पण त्यानंतर अखेर काल मुंबईला पहिला विजय मिळवला. या विजयानंतर रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने तीन फोटो देखील शेअर केले. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या फोटोंमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही. रोहितने पहिल्या फोटोत सामन्याचा हिरो असलेला रोमारियो शेपर्ड याच्यासोबतचा फोटो पोस्ट केला. दुसऱ्या फोटो सामना पाहायला आलेली लहान मुले एन्जॉय करतानाचा फोटो पोस्ट केला होता. तर तिसऱ्या फोटोत दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत आणि अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा यांच्या रोहित मजा मस्ती करतानाचा फोटो होता. रोहितने विरोधी संघाच्या कर्णधारासोबतचा फोटो शेअर केला पण स्वत:च्या संघाचा कर्णधार असलेल्या हार्दिकचा फोटो पोस्ट करणे टाळले. त्यामुळे रोहित-हार्दिक वादाच्या चर्चा नव्याने सुरु झाल्या आहेत.
दरम्यान, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यात सारं काही आलबेल नाही अशा चर्चा काही दिवसांपासून रंगल्या आहेत. त्यांच्या वादामुळे मुंबईच्या संघात दोन गट झाले असून ड्रेसिंग रूममध्ये फार चांगले वातावरण नाही असेही बोलले जात आहे. यावर हार्दिक पांड्याने मात्र स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. "आम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे. आम्ही मनात पक्कं केलं होतं आणि आम्ही स्वतःवर विश्वास कायम राखला होता. आम्ही रणनीतीत काही तांत्रिक बदल केले आणि आता आमचा संघ संतुलित व सेट झालेला दिसतोय. हे संघासाठी खूप महत्त्वाचे आहे. ड्रेसिंग रुममध्येही प्रचंड प्रेम मिळतंय, काळजी घेतली जातेय. एकमेकांवर विश्वास ठेवून त्याच्या पाठीशी उभे राहणे, हेच चित्र ड्रेसिंग रुममध्ये आहे,'' असे म्हणत त्याने वादाच्या चर्चा फेटाळून लावल्या.
Web Title: Rohit Sharma shares Insta Post after Mumbai Indians first win in IPL 2024 Hardik Pandya photo ignored MI vs DC
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.