आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग अर्थात आयपीएल... आयपीएल आणि प्रसिद्धी यांचे समीकरण वेगळेच आहे. आयपीएलची क्रेझ एवढी आहे की यापुढे आंतरराष्ट्रीय सामन्यांचा देखील दबदबा कमी होतो. दोन महिने क्रिकेट विश्वाला आपलेसे करणारी ही बहुचर्चित लीग आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आयपीएल २०२४ ला सुरूवात होण्यासाठी आता अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. यासाठी पुढील महिन्यात खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. अशातच हार्दिक पांड्याचीमुंबई इंडियन्सच्या संघात घरवापसी झाली अन् आयपीएलचा आगामी हंगाम आतापासून रंगात आला.
खरं तर हार्दिकच्या येण्याने मुंबईचा संघ अधिक मजबूत झाला आहे. मात्र, रोहित शर्मानंतर मुंबईच्या संघाची धुरा हार्दिकच्या खांद्यावर सोपवली जाईल अशी चर्चा रंगली आहे. अशातच दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने एक मोठे विधान केले. रोहित शर्माच मुंबईचा कर्णधार असावा असे मला वाटते, असे मिस्टर ३६० ने सांगितले. तो त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलत होता.
... तरच हार्दिक मुंबईचा कर्णधार असावा - डिव्हिलियर्स डिव्हिलियर्सने सांगितले की, मला वाटते की रोहित शर्मा हाच मुंबई इंडियन्सचा कर्णधार असावा आणि राहिलही... पण कधी काय होईल याची कोणालाच कल्पना नसते. जर दुखापतीच्या कारणास्तव रोहित खेळू शकला नाहीतर संघ व्यवस्थापनाकडे हार्दिकसारखा चांगला पर्याय असेल. आपल्या सर्वांना माहिती आहे की, हार्दिकमध्ये काय क्षमता आहे, त्याने मागील दोन आयपीएल हंगामात याची प्रचिती दाखवून दिली आहे. पांड्याची घरवापसी झाली ही मुंबईच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
रोहितच्या नेतृत्वात मुंबईचा विजयरथ आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणजे रोहित शर्मा. हिटमॅनच्या नेतृत्वात मुंबईने पाचवेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये किताब पटकावण्यात मुंबई इंडियन्सच्या संघाला यश आले. मुंबईशिवाय चेन्नई सुपर किंग्जने देखील पाचवेळा जेतेपद पटकावण्याची किमया साधली.
दरम्यान, क्रिकेट वर्तुळात मागील काही दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू असलेला हार्दिक पांड्या सोमवारी अधिकृतरित्या मुंबई इंडियन्सच्या संघाचा सदस्य झाला. पांड्याने आपल्या संघात घरवापसी केली असून आयपीएल २०२४ मध्ये तो मुंबईच्या ताफ्यात दिसणार आहे. हार्दिक पांड्याला त्याच्या घरच्या संघात जायचे होते, त्याचीच इच्छा असल्याकारणानेच त्याला मुंबईच्या संघात पाठवले गेले, असे गुजरातच्या फ्रँचायझीने स्पष्ट केले.