Join us  

Rohit Sharma, IND vs BAN Test: "त्या रोहितला घरीच बसवा..."; Team India च्या माजी क्रिकेटपटूचं धक्कादायक विधान

भारतीय कर्णधार रोहित शर्मा बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 4:05 PM

Open in App

Rohit Sharma, IND vs BAN Test: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा डाव्या हाताच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे बांगलादेश विरुद्धच्या चितगाव कसोटी सामन्यात सहभागी होऊ शकला नाही. वन डे मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान रोहित शर्माला ही दुखापत झाली होती. आता रोहित २२ डिसेंबरपासून मीरपूर येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी बांगलादेशला परतण्याची शक्यता आहे. रोहितच्या पुनरागमनानंतर, निवड समितीला प्लेईंग-11 निवडण्यासाठी चांगलीच कसोटी असणार आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जाडेजालाही रोहित शर्माबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजाराने शतके झळकावल्यामुळे रोहित परतल्यावर संघाबाहेर कोण बसणार असा प्रश्न अजय जाडेजाला विचारण्यात आला. तेव्हा अजय जाडेजाने धक्कादायक उत्तर दिले. अजय जाडेजाने 'सोनी'शी बोलताना म्हणाला, "आता रोहितला घरी बसवा. अंतिम ११ खेळाडू निवडण्यावर खूप चर्चा व वाद होऊ शकतो. म्हणूनच मी रोहितला घरात बसायला सांगत आहे. जेव्हा एखाद्या खेळाडूच्या हाताला फ्रॅक्चर होते आणि तो सुमारे १० दिवस बॅट धरू शकत नाही. तेव्हा तो खेळाडू बरा झाला तरी तो दुसऱ्या दिवशी संघात सामील होऊ शकत नाही."

"हे फ्रॅक्चर आहे. ते पूर्णपणे बरे होण्यासाठी आणखी किमान १५ दिवस लागतील. आणि आपल्याला अद्याप दुखापत किती गंभीर आहे याची कल्पना नाही. म्हणूनच मी असं म्हणून की रोहित शर्माने सध्या तरी घरीच बसावं. ही सूचना विचित्र वाटली तरी तेच योग्य ठरेल. आम्ही तात्पुरता उपाय शोधत आहोत आणि त्यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे. कारण रोहित परतला तर शतकवीर शुबमन गिलला दुसऱ्या कसोटीतून बाहेर बसावे लागू शकते आणि तसे झाले तर तो त्याच्यावर अन्यायच ठरेल," असे अतिशय स्पष्ट मत त्यांनी मांडले.

शुबमन गिलने संधीचे सोनं केलं!

शुभमन गिल चितगाव येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या प्लेइंग-11चा दावेदार नव्हता. मात्र रोहित शर्माच्या दुखापतीनंतर गिलला संधी मिळाली. गिलने या संधीचे सोने करून भारताच्या दुसऱ्या डावात शतक झळकावले. पहिल्या डावात ४० चेंडूत २० धावा करणाऱ्या गिलला दुसऱ्या डावात सूर गवसला. त्याने मोक्याच्या क्षणी दमदार खेळ केला. १५२ चेंडूमध्ये त्याने ११० धावा केल्या. त्याने १० चौकार आणि ३ षटकारांनी त्याची शतकी खेळी सजवली.

शुबमन गिलशिवाय चेतेश्वर पुजारानेही दुसऱ्या डावात नाबाद १०२ धावांची खेळी केली. चेतेश्वर पुजाराचे हे ५२ डावानंतर पहिले कसोटी शतक ठरले. यासोबतच त्याची ही आतापर्यंतची सर्वात वेगवान शतकी खेळी होती. गिल-पुजाराच्या शतकी खेळीमुळे भारतीय संघ बांगलादेशला ५१३ धावांचे लक्ष्य देण्यात यशस्वी ठरला. प्रत्युत्तरात बांगलादेशचा दुसरा डाव केवळ ३२४ धावांवर आटोपला.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशरोहित शर्माशुभमन गिलचेतेश्वर पुजारा
Open in App