Join us  

"रोहितसाठी 'ही' चिंतेची बाब; कोहलीने 'हा' मोह टाळावा"; मुंबईकर माजी क्रिकेटपटूचं रोखठोक मत 

Rohit Sharma Virat Kohli Flop, IND vs NZ 1st Test: भारताचे दोन दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली आज 'फ्लॉप' ठरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 5:59 PM

Open in App

Rohit Sharma Virat Kohli Flop, IND vs NZ 1st Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताची सुरुवात खूपच खराब झाली. पहिला दिवस पावसामुळे वाया गेल्यावर आज दुसऱ्या दिवशी भारताचा डाव अवघ्या ४६ धावांत आटोपला. भारताचे दिग्गज आणि अनुभवी फलंदाज पूर्णपणे अयशस्वी ठरले. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, रवींद्र जाडेजा, रवी अश्विन, रिषभ पंत, यशस्वी जैस्वाल आणि सर्फराज खान साऱ्यांनीच निराशा केली. आपल्या आक्रमक खेळीसाठी ओळखला जाणारा रोहित शर्मा आजही तसाच खेळायला गेला, पण अवघ्या २ धावांवर त्याने आपली विकेट गमावली. चेंडू स्विंग होत असूनही तो पुढे येऊन मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. फॅन्सने सोशल मीडियावर रोहितवर टीका केली. मुंबईकर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी रोहितसह सर्व फलंदाजांना सुनावले.

"रोहित शर्माचा फॉर्म आणि फलंदाजीत बचाव करण्याचे तंत्र ही टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे. आगामी दौरा ऑस्ट्रेलियाचा आहे. तिथे चेंडू इतका सीमवर पडून स्विंग होणार नाही. पण रोहितची कामगिरी हा विचार करायचा विषय आहे. तसेच विराट कोहलीने देखील फ्रंट फूटवर खेळण्याचा मोह टाळला पाहिजे. यशस्वी जैस्वालने आज चांगली झुंज दिली. त्याला सुधारणेला वाव आहे. सर्फराज खानने फारच निराश केले. त्याने त्याची खेळण्याची पद्धत बदलायला हवी. पंतबद्दल माझी काहीच तक्रार नाही. पण भारतीय संघ व्यवस्थापनाने आताच चिंतेच्या बाबी ओळखणे आणि त्यावर काम करणे गरजेचे आहे," असे संजय मांजरेकर म्हणाला.

असा गडगडला टीम इंडियाचा डाव

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा २ धावांवर बाद झाला. रोहित पाठोपाठ विराट कोहली आणि सर्फराज खान दोघेही शून्यावरच माघारी परतले. त्यानंतर रिषभ पंत आणि यशस्वी जैस्वाल यांच्यात भागीदारी होण्यास सुरुवात झाली होती. पण जैस्वाल १३ धावा काढून तंबूत परतला. त्याच्याच पाठोपाठ केएल राहुल, रवींद्र जाडेजा आणि आर अश्विन हे तिघेही शून्यावर बाद झाले. रिषभ पंतने सर्वाधिक २० धावा केल्या. त्यानंतर मात्र भारताचा डाव ४६ धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंड कडून मॅट हेन्रीने १५ धावांत ५, विल ओ'रूरकेने २२ धावांत ४ तर टीम सौदीने १ बळी घेतला.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडरोहित शर्माविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघन्यूझीलंडमुंबई