Rohit Sharma Yashasvi Jaiswal Shreyas Iyer, Mumbai Ranji Trophy : टीम इंडिया सध्या इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामने खेळवले जाणार आहेत. जे खेळाडू सध्या टी२० संघाचा भाग नाहीत, ते सध्या देशांतर्गत रणजी स्पर्धेत खेळत आहेत. यामध्ये रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यरसारख्या खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. हे तिन्ही खेळाडू मुंबई संघाचा भाग आहेत. अलीकडेच या स्टार खेळाडूंच्या उपस्थितीत मुंबई संघाला जम्मू-काश्मीरविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता त्यांच्या संघाला ३० जानेवारीपासून मेघालयविरुद्ध पुढील सामना खेळायचा आहे. याआधी एक मोठा अपडेट समोर आला आहे.
रोहित,जैस्वाल, अय्यर मुंबई संघातून बाहेर
मुंबई आणि मेघालय यांच्यातील हा सामना बीकेसी ग्राऊंडवर ३० जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. पण या सामन्यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यर उपलब्ध नसतील. इंग्लंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी नागपुरात एक छोटेखानी सराव शिबिर आयोजित केले जाणार आहे. त्याचबरोबर ही मालिका ६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. दुसरीकडे, अष्टपैलू शिवम दुबे हा देखील मुंबई संघाचा भाग असणार नाही. कारण त्याचा इंग्लंडविरुद्धच्या सुरु असलेल्या टी२० मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त नितीश रेड्डीच्या जागी त्याला संघात घेतले गेले आहे.
मुंबईचे 'स्टार' खेळाडू जम्मू-काश्मीरविरुद्ध 'फ्लॉप'
जम्मू-काश्मीर विरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबईला ५ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात हे चारही खेळाडू फ्लॉप ठरले. या सामन्याच्या पहिल्या डावात रोहितला केवळ ३ धावा तर दुसऱ्या डावात २८ धावा करता आल्या. पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात २६ धावा केल्यानंतर यशस्वी जैस्वालनेही आपली विकेट गमावली. अशीच परिस्थिती श्रेयस अय्यरच्या बाबतीतही पाहायला मिळाली. त्याला पहिल्या डावात केवळ ११ धावा आणि दुसऱ्या डावात १७ धावा करता आल्या. दुसरीकडे, शिवम दुबे दोन्ही डावात शून्यावर बाद झाला.