Rohit Sharma slams Pakistan Inzamam Ul Haq: पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू इंझमाम-उल-हक याने भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या रिव्हर्स स्विंग गोलंदाजीवरून काही आरोप केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्शदीप १५व्या षटकात रिव्हर्स स्विंग गोलंदाजी करत होता. हे खरे पाहता शक्य नाही. याचाच अर्थ भारतीय गोलंदाज सतत चेंडूशी छेडछाड करत आहेत, असा दावा इंझमामने केला. या बिनबुडाच्या आरोपांवर भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.
"अशा दाव्यांबद्दल आता मी काय बोलू? विंडिजमध्ये प्रचंड उकाडा असतो. खेळपट्टी कोरडी असते. त्यामुळे चेंडू आपोआपच रिव्हर्स स्विंग होतो. हा प्रकार सगळ्याच संघांबरोबर होत आहे. केवळ आमच्याच गोलंदाजांना रिव्हर्स स्विंग मिळतो असे नाही. सर्वच गोलंदाजांना रिव्हर्स स्विंग मिळतोय. काही वेळा आपण खुलेपणाने विचार करणं गरजेचं असतं. विचार करताना तुम्ही कुठल्या परिस्थितीत क्रिकेट खेळत आहात हे देखील महत्त्वाचे असते. हे सामने इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियात सुरु नाहीयेत. मी तरी एवढंच सांगू शकतो" अशा शब्दांत रोहितने इंझमामच्या दाव्याचा खरपूस समाचार घेतला.
इंझमाम काय म्हणाला होता?
"अर्शदीप सिंग आणि इतर भारतीय वेगवान गोलंदाज २०२४ टी२० वर्ल्डमध्ये सतत चेंडूशी छेडछाड करत आहेत आणि त्यामुळेच त्यांना रिव्हर्स स्विंग मिळत आहे. भारताचे गोलंदाज चेंडू सारखा बदलत आहेत. चेंडू रिव्हर्स स्विंग कसा आणि केव्हा होतो याची आम्हाला माहिती आहे. जर अर्शदीप सिंगला १५व्या षटकात रिव्हर्स स्विंग मिळत असेल तर याचा अर्थ चेंडूशी काहीतरी छेडछाड केली गेली आहे," असा दावा इंझमामने केला होता.