बंगलुरू : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत वास्तव्यास असलेला भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार रोहित शर्मा पहिली फिटनेस चाचणी पास करण्यात यशस्वी ठरला आहे. तर दुसरीकडे अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा अजूनसुद्धा पूर्णपणे तंदुरुस्त झालेले नाहीत.
स्नायू दुखल्यामुळे रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघाबाहेर पडला होता. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आपल्या तंदुरुस्तीवर मेहनत घेतो आहे. एकदिवसीय संघाची घोषणा होण्यापूर्वी आता रोहित शर्माला तंदुरुस्तीची अंतिम चाचणी पण पास करावी लागणार आहे. तरच त्याचा विचार अंतिम संघनिवडीच्या वेळी होऊ शकतो. येत्या दोन ते तीन दिवसांत दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी अंतिम संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. सध्या सुरू असलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर १९ जानेवारीपासून तीन एकदिवसीय सामन्यांला सुरुवात होणार आहे.
रवींद्र जडेजा, अक्षर पटेल अद्याप तंदुरुस्त नाहीत
एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार रोहित दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. मात्र त्याचे भारतीय संघातील दोन साथीदार रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे अद्यापही दुखापतीतून पूर्णपणे सावरू शकलेले नाही. एनसीएमध्ये सुरू असलेल्या खेळाडूंच्या पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत हे तिन्ही खेळाडू गेल्या काही दिवसांपासून स्वत:च्या तंदुरुस्तीवर मेहनत घेत होते. मात्र रोहितप्रमाणेच जोपर्यंत जडेजा आणि पटेल स्वत:ची तंदुरुस्ती चाचणी पास करत नाही तोपर्यंत निवडकर्ते त्यांचा संघनिवडीसाठी विचार करणार नाही.
तरुण चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता
या खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंना दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संधी मिळण्याची शक्यता आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये वेंकटेश अय्यर आणि ऋतुराज गायकवाड यांनी चमकदार कामगिरी केली होती. तर अनुभवी शिखर धवनला मात्र आपली छाप सोडता आली नाही. त्यामुळे सध्यातरी ऋतुराज आणि वेंकटेशने आपली दावेदारी मजबूत केलेली आहे.
Web Title: Rohit Sharma succeeds in fitness test; Jadeja, Akshar Patel waiting
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.