Rohit Sharma Suryakumar Yadav Mumbai Indians, IPL 2025: भारतीय संघाचा वनडे कर्णधार रोहित शर्मा आणि टी२० कर्णधार सूर्यकुमार यादव हे दोघेही IPL मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतात. या संघाने आतापर्यंत सर्वाधिक ५ ट्रॉफी जिंकल्या आहेत. पण गेल्या हंगामात मुंबईच्या संघात उलथापालथ झाली. हार्दिक पांड्याला संघात घेत कर्णधार करण्यात आल्याने मुंबई इंडियन्सची वरिष्ठ खेळाडूंची नाराज असल्याची चर्चा होती. संघाच्या खेळावरही त्याचा परिणाम दिसून आला आणि ते गुणतालिकेत तळाशी राहिले. आता IPL 2025 साठी लवकरच लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. त्याआधी रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव मुंबईचा संघ सोडू शकतात. एक तगडा संघ त्यांना आपल्या ताफ्यात सामील करून घेण्यास उत्सुक आहे असे सांगितले जात आहे.
एका रिपोर्टनुसार, मुंबई इंडियन्सच्या संघाला लवकरच दोन मोठे धक्के बसू शकतात. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव हे मुंबईच्या संघाचे दोन बडे खेळाडू मुंबई इंडियन्सची साथ सोडू शकतात. दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, हे दोनही खेळाडू मुंबईचा संघ सोडून बाहेर पडल्यानंतर एक तगडा संघ त्या दोघांनाही संघात विकत घेण्यासाठी मोठी बोली लावू शकतो. तो संघ म्हणजे कोलकाता नाइट रायडर्स (KKR). पुढील हंगामासाठी लवकरच मेगा लिलावाचे आयोजन केले जाणार आहे. या लिलावात कोलकाताचा संघ या दोघांनाही आपल्या ताफ्यात घेण्यास खुपच उत्सुक असल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.
हार्दिकच्या नेतृत्वाखाली पहिल्या वर्षी मुंबई इंडियन्सच्या संघाला गुणतालिकेत तळाशी राहावे लागले. आगामी हंगामात ही परिस्थिती बदलण्यासाठी मुंबईचा संघ प्रयत्नशील असेल. पण अशा वेळी जर रोहित शर्माने मुंबईचा संघ सोडला तर त्याच्यासाठी कोलकातासह गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांची दारेही उघडी आहे. दिल्लीच्या संघाचा कर्णधार रिषभ पंत दिल्ली सोडून चेन्नई सुपर किंग्ज संघात जाऊ शकतो. कारण दिल्लीचा संघ पंतच्या कामगिरीवर खुश नसल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत आगामी IPL लिलावाआधी बरेच बडे खेळाडू आपापल्या संघाला सोडचिठ्ठी देताना दिसतील अशी चर्चा आहे.