Rohit Sharma Team India Record, IND vs ENG 4th Test: पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा ५ गडी राखून पराभव केला. पहिल्या सामन्यात पराभूत होणाऱ्या रोहित शर्माच्या टीम इंडियाने आज पराक्रम करून दाखवला. भारतीय संघाने सलग तीन कसोटी सामने जिंकत पाच सामन्यांची कसोटी मालिका जिंकली. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ३५३ तर भारताने ३०७ धावा केल्या. दुसऱ्या डावात इंग्लंड १४५ वर गारद झाला. मग इंग्लंडच्या संघाने चौथ्या डावात भारताला १९२ धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. यासह टीम इंडियाने एक धडाकेबाज असा पराक्रम करून दाखवला.
टीम इंडियाचा धमाकेदार पराक्रम
घरच्या मैदानावर 200 पेक्षा कमी धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत आपला अपराजित राहण्याचा विक्रम कायम ठेवला आहे. भारतीय संघ घरच्या मैदानावर 33व्यांदा चौथ्या डावात 200 पेक्षा कमी धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता. या 33 सामन्यांपैकी टीम इंडियाने 30व्यांदा विजय मिळवला आहे. 200 पेक्षा कमी लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने सामना अनिर्णित ठेवल्याचे केवळ 3 वेळा घडले आहे. अशा परिस्थितीत, अद्याप भारतीय संघ अजिंक्य आहे. कारण 200 पेक्षा कमी लक्ष्याचा पाठलाग करताना भारत एकदाही हरलेला नाही.
सामन्यात काय घडलं?
रांची कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात जो रूटच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने 353 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाचा पहिला डाव ध्रुव जुरेलच्या 90 धावांच्या खेळीनंतरही 307 धावांवर आटोपला. अशाप्रकारे, इंग्लंडला पहिल्या डावात 46 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात पाहुण्या संघाची फलंदाजी अत्यंत खराब झाली आणि त्यांना केवळ 145 धावाच करता आल्या. त्यामुळे टीम इंडियाला सामना जिंकण्यासाठी 192 धावांचे लक्ष्य मिळाले. कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांनीही अर्धशतके ठोकली. तर ध्रुव जुरेल ३९ धावा काढून नाबाद राहिला. त्याचाच सामनावीर म्हणून गौरव करण्यात आला.