Rohit Sharma BCCI, Team India Captain | नवी दिल्ली : बॉर्डर-गावसकर चषक गमावल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) नवा कर्णधार शोधण्याबाबत सांगितले आहे. 'मी केवळ पुढील २-३ महिन्यांपर्यंतच कर्णधार म्हणून राहील. त्यामुळे माझ्या जागी नव्या कर्णधाराचा शोध सुरू करावा,' असे रोहितने बीसीसीआयला कळवले आहे. न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिकेत ०-३ असा व्हाइटवॉश पत्करावा लागल्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर- गावसकर चषक मालिकेत खराब कामगिरी केली. यानंतर बीसीसीआयच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत रोहितने कर्णधारपद सोडण्याबाबत मत व्यक्त केल्याचे म्हटले जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहितने आपली बाजू स्पष्ट करताना सांगितले की, तो आगामी २-३ महिन्यांपुरताच कर्णधारपदावर राहील.
याचा अर्थ, इंग्लंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसह पाकिस्तानच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपर्यंत रोहित भारताचे नेतृत्व करेल. त्याचवेळी, अशीही शक्यता व्यक्त होत आहे की, जर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी केली, तर कर्णधार म्हणून कायम राहण्यास रोहितची समजूत काढण्यात येईल.
पुढील कर्णधार बुमराह?
मिळालेल्या माहितीनुसार, रोहितनंतरचा कर्णधार म्हणून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या नावाचा विचार झाला आहे. बहुतांश अधिकाऱ्यांनी कर्णधार म्हणून बुमराहला पाठिंबा दर्शविला. मात्र, त्याची तंदुरुस्ती मुख्य अडचण आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो सर्व सामने खेळण्याइतपत तंदुरुस्त आहे का, हे पाहावे लागेल.
परवानगीनंतरच देशांतर्गत क्रिकेट
बीसीसीआयच्या बैठकीत एक निर्णय असा घेण्यात आला की, राष्ट्रीय संघातील कोणताही खेळाडू तेव्हाच देशांतर्गत स्पर्धेत खेळेल, जेव्हा फिजिओ रिपोर्टसह भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांचीही परवानगी त्या खेळाडूला मिळेल. कार्यभार अधिक असल्यास त्या खेळाडूला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यामसून सूट दिली जाऊ शकते.
विराट-रोहितला स्वतःचे भविष्य ठरवू द्या : कपिल देव
विराट कोहली आणि रोहित शर्मा मोठे खेळाडू आहेत. त्यामुळे खेळातील आपल्या भविष्याबाबत त्यांना स्वतःलाच निर्णय घेऊ द्या, असे भारताचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांनी म्हटले, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील खराब कामगिरीनंतर सध्या हे दोन्ही स्टार फलंदाज टीकेचे धनी बनले आहेत. पुढील कर्णधाराविषयी कपिल म्हणाले की, यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद झाला नाही पाहिजे. जो विद्यमान कर्णधार आहे, तोदेखील कोणाची तरी जागा घेऊनच आला आहे. जो कोणी कर्णधार असेल, त्याला पूर्ण वेळ मिळाला पाहिजे. तसेच, भिन्न काळातील खेळाडूंची तुलना करणेही चुकीचे आहे.
विश्लेषण बैठकीत महत्त्वाची चर्चा
बीसीसीआयच्या ३ विश्लेषण बैठकीत पदाधिकाऱ्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या खराब प्रदर्शनानंतर रोहित शर्मासह मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनाही प्रश्न विचारले. रोहितसह विराट कोहलीच्या खालावलेल्या कामगिरीबाबत चर्चा झाली. रोहितने सांगितले की, बोर्ड ज्याला कोणाला कर्णधार निवडेल, त्याला माझा पूर्ण पाठिंबा असेल. आयपीएल २०२५ संपल्यानंतर भारतीय कसोटी संघाच्या नव्या कर्णधाराची निवड प्रक्रिया सुरू होऊ शकेल.