मुंबईतल्या आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडवरून सुरू असलेल्या वादात भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मानंही उडी घेतली आहे. मैदानावर चौफेर फटकेबाजी करणाऱ्या रोहितनं आरेच्या मुद्यावरही सडेतोड मत मांडले.
मुंबईतल्या आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडसाठी अनेक झाडं तोडण्यात आली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात सुनावणी करत तोडकामावर बंदी घातली आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या विशेष खंडपीठानं जनहित याचिकेवर सुनावणी घेतली. सुनावणीदरम्यान त्यांनी झाडं तोडण्यास मनाई केली आहे. तसेच या प्रकरणात पर्यावरण आणि वन मंत्रालयालाही पक्षकार बनवलेलं आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी 21 ऑक्टोबरला होणार आहे.
सुनावणीनंतर वकील संजय हेगडेंनी मीडियाला कोर्टात झालेल्या सुनावणीची माहिती दिली. ते म्हणाले, सॉलिसिटर जनरलनं न्यायालयात सांगितलं की, मेट्रोसाठी जेवढी झाडं तोडायची होती, तेवढी तोडली आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी महाराष्ट्र सरकारला काही प्रश्न विचारले. आरे जंगल हे इको सेन्सिटिव्ह झोन आहे की नो डेव्हलपमेंट झोन आहे?, त्यानंतर न्यायालयानं यासंदर्भात पुरावे देण्याची मागणीही सरकारकडे केली आहे. न्यायालयानं म्हटलं आहे की, आरेच्या कारशेडसाठी झाडं कापली जाऊ नयेत.
रोहित म्हणाला,''जीवनावश्यक वस्तूचं असं नुकसान करणं चुकीचं आहे. मुंबईतील वातावरण संतुलित ठेवण्यात आरेचा महत्त्वाचा वाटा आहे. असं असूनही आपण तिथे वृक्षतोड कशी करू शकतो, शिवाय तेथील वन्यजीवांच्या अस्तित्वाचं काय?''