मुंबईः चेन्नई सुपरकिंग्जचा 'कूssल' कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या पंजाबविरुद्धच्या झंझावाती खेळीनं चाहत्यांना खूश करून टाकलंय. सोशल मीडियावर यत्र-तत्र-सर्वत्र त्याच्या ७९ धावांचीच हवा आहे. पण, धोनीच्या या धुवाधार खेळीनं मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या काळजीत भर घातली आहे. रोहितनं ट्विटरवरून धोनीचं अभिनंदन केलंय, पण त्यासोबतच मनातील एक चिंताही व्यक्त केलीय.
'महेंद्रसिंह धोनीने जबरदस्त फलंदाजी केली. त्यानं जवळपास विजय खेचूनच आणला होता. २०० धावांचं आव्हान देणंही आता सुरक्षित मानू शकत नाही? मला कालच याची जाणीव झाली होती', असं ट्विट रोहित शर्मानं केलं आहे.
शनिवारी, दिल्ली डेअरडेविल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईनं १९४ धावांचा डोंगर उभारला होता. पण जेसन रॉयच्या जिगरबाज खेळीच्या जोरावर दिल्लीनं १९५ धावांचं महाकठीण आव्हान पार केलं होतं. त्यापाठोपाठ, रविवारी चेन्नईनंही असाच धडाकेबाज खेळ केला. १९७ धावांचं लक्ष्य गाठण्यात ते थोडक्यात कमी पडले. अवघ्या ४ धावांनी त्यांचा पराभव झाला. पण, महेंद्रसिंह धोनीनं सगळ्यांची मनं जिंकून घेतली. पाठदुखीने त्रस्त असतानाही, अवघ्या ४० चेंडूत त्यानं ७९ धावा तडकावल्या. त्याबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. त्याची ही खेळी सगळ्याच प्रतिस्पर्ध्यांसाठी धोक्याची घंटा आहे. त्याचाच प्रत्यय रोहित शर्माच्या ट्विटमधून येतो.