नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचेट्विटर अकाऊंट काही वेळासाठी हॅक झाल्याचा संशय अनेकांकडून व्यक्त केला गेला. कारण रोहितच्या अकाऊंटवरून काही विचित्र ट्विट्स मंगळवारी सकाळी करण्यात आले होते. त्यामुळे हा संशय बळावला.
पहिले ट्विट होते की, “मला नाणेफेक करायला आवडतं. खास करुन तेव्हा आवडतं जेव्हा उडवलेला शिक्का माझ्या पोटात जातो.” दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले होते की, “मधमाशांसाठी तयार करण्यात आलेले खोके हे बॉक्सिंग करण्यासाठी खूप चांगले असतात.” तिसरे ट्विट तर मजेशीर होते, त्यात “क्रिकेट बॉल आपण खाऊ शकतो का?” असा प्रश्न विचारण्यात आला होता.
हे एकूण तीन ट्विट्स होते; पण हे सर्व फारच विचित्र आणि असंबद्ध ट्विट्स असल्याचे दिसून आले. त्यांच्यातील तपशिलाचा एकमेकांशीही फारसा काहीच संबंध नव्हता. त्यामुळे रोहित असे ट्वीट करणार नाही याची खात्री पटल्यानंतर त्याचे अकाऊंट हॅक झाल्याची समाजमाध्यमांवर चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे रोहित शर्मा हा ट्विटरवर फारसा सक्रिय नसतो. काही खास कारण असेल तरच तो ट्वीट्स करताना दिसतो. मात्र, बीसीसीआय किंवा रोहित शर्मा यांच्यापैकी कोणीही यासंबंधी काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. भारतीय संघ सध्या मोहालीमध्ये आहे. ४ तारखेपासून येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. हा सामना विराटचा १०० वा तर रोहितचा कसोटी कर्णधार म्हणून पहिलाच सामना असणार आहे.