Join us  

VIDEO: 'वाईड किधर दे रहा है यार!'; जेव्हा अम्पायरच्या निर्णयावर बोलला रोहित शर्मा, अन् मग...

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात रिव्ह्यूवरून संभ्रम; पंचांनी वाईडचा निर्णय दिल्यानं रोहित शर्मा चकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 9:55 AM

Open in App

मुंबई: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतानं सफाईदार विजय मिळवला. विंडिजनं दिलेलं १५८ धावांचं आव्हान भारतानं ६ गडी राखून पार केलं. भारताच्या विजयात रोहित शर्मा, व्यंकटेश अय्यर, सूर्यकुमार यादव, रवी बिश्नोई यांनी मोलाचं योगदान दिलं. भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना रिव्ह्यूवेळी काहीसा संभ्रम पाहायला मिळाला.

पंचांनी दिलेल्या एका निर्णयानंतर रोहित शर्मानं काहीसं आश्चर्य व्यक्त केलं. रोहितनं दिलेली रिऍक्शन सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. भारतीय संघातील खेळाडू प्रतिस्पर्धी खेळाडू झेलबाद असल्याचं अपील पंचांकडे करत होते. पण पंचांनी चेंडू वाईड असल्याचं म्हटलं. त्यावर रोहित 'वाईड किधर दे रहा है यार', असं म्हणाला.

रवी बिश्नोई गोलंदाजी करत असताना त्यानं टाकलेला चेंडू रॉस्टन चेजच्या पायाजवळून गेला. चेंडूनं बॅटला स्पर्श केल्याचं भारतीय संघाला वाटत होतं. त्यामुळे रिव्ह्यू घेण्याची संघाची तयारी होती. रोहित शर्मा रिव्ह्यूसाठी पंचांकडे जात असताना त्यांनी चेंडू वाईड दिला. त्यावर रोहितच्या तोंडूनं वाईड किधर दे रहा है यार असे शब्द निघाले.

रिव्ह्यूमध्ये चेंडू वाईड नसल्याचं दिसलं. चेंडू बॅटला लागून यष्टिरक्षक ऋषभ पंतच्या हातात विसावला असं भारतीय खेळाडूंना वाटत होतं. त्यामुळे त्यांना चेज बाद असल्याचं अपील केलं. मात्र प्रत्यक्षात चेंडू पॅडला लागून पंतच्या हातात गेल्याचं रिप्लेमध्ये दिसलं. त्यामुळे पंचांनी चेंडू वाईड देण्याचा निर्णय मागे घेतला.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्मा
Open in App