भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून सुरू होत आहे. भारत आणि बांगलादेश प्रथमच डे नाइट कसोटी सामना खेळणार आहेत. या मालिकेनंतर सर्वांना उत्सुकता आहे ती भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेची. या मालिकेत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन ट्वेंटी-20 आणी तीन वन डे सामने खेळवण्यात येणार आहे. 6 डिसेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे, परंतु त्यापूर्वीच दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये सोशल वॉर सुरू झाला आहे. आंद्रे रसेलनं भारताला त्यांच्याच घरी पराभूत करू अशी गर्जना केली, तर किरॉन पोलार्डनं भारताच्या रोहित शर्माला अनफॉलो केले. आता या वॉरमध्ये रोहितही उतरला आहे आणि त्यानं पोलार्डला लिफ्ट देऊन चक्क अर्ध्या रस्त्यात उतरवल्याचं पाहयाला मिळत आहे.
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल म्हणाला की, " भारतामध्ये खेळण्याचा आम्हाला चांगला अनुभव आहे. त्याचबरोबर आमचा संघही चांगला बांधला गेला आहे. त्यामुळे भारताला आगामी मालिकांमध्ये आम्ही धक्का देऊ शकतो. " त्यानंतर पोलार्डनं रोहितला अनफॉलो केलं. या मालिकेचे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीनं एक जाहीरात तयार केली आहे. त्यात रोहित विंडीजच्या पोलार्डला घेण्यासाठी विमानतळावर जातो आणि अर्ध्या रस्त्यात आल्यावर पोलार्डला सामनासकट गाडीतून उतरवतो. रोहित नेमकं असं का करतो ते पाहाच...
भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला मुंबईतील ट्वेंटी-20 सामना दुसरीकडे हलवणार?
पहिला ट्वेंटी-20 सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. पण, मुंबई पोलिसांनी या सामन्याला सुरक्षा पुरवण्यास अडचण होईल, असे सांगितले आहे. 6 डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि त्यामुळे मुंबईतील बहुतेक पोलीस त्या ड्युटीवर असणार आहे. त्यामुळे क्रिकेट सामन्याला सुरक्षा पुरवण्या इतके पोलीस मुंबई पोलिसांकडे उपलब्ध नसल्याचे बोलले जात आहे.
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी क्रिकेट सामन्याला सुरक्षा पुरवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनला सांगितले आहे. शिवाय अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर 6 डिसेंबरला तणाव निर्माण होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यात महापरिनिर्वाण दिवस असल्यानं पोलिसांवर प्रचंड ताण असणार आहे. ''मुंबई पोलिसांच्या प्रतिनिधिंनी आम्हाता वस्तुस्थितीची कल्पना दिली. याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर हा सामना होईल की नाही, हे स्पष्ट होईल,''असे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.
विंडीज मालिकेचे वेळापत्रक
ट्वेंटी-20 मालिका6 डिसेंबर - मुंबई8 डिसेंबर - तिरुवनंतपुरम11 डिसेंबर - हैदराबाद
वन डे मालिका15 डिसेंबर- चेन्नई18 डिसेंबर- विशाखापट्टणम22 डिसेंबर - कट्टक