Join us

बुमराहसह रोहित-विराट जोडगोळी इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून 'आउट'?

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 17:09 IST

Open in App

बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आलीये. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना सिडनीच्या मैदानात रंगणार आहे. या मालिकेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी भारतीय संघ घरच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध मर्यादीत सामन्यांची मालिका खेळणार आहे. 

टीम इंडिया घरच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध खेळणार टी-२० आणि वनडे मालिका २२ जानेवारीपासून पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेनं भारत-इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय मालिकेला सुरुवात होणार असून १२ फेब्रुवारीला  वनडे सामन्यासह या मालिकेची सांगता होईल. चॅम्पियन्स ट्रॉफीआधी अनेक स्टार क्रिकेटर्ससाठी इंग्लंड विरुद्धची वनडे मालिका महत्त्वाची मानली जात असताना इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत कर्णधार रोहित शर्मासहविराट कोहली आणि जसप्रीत बुमराह सहभागी होणार नाहीत, अशी बातमी समोर येत आहे. 

बुमराहसह रोहित-विराटला हवीये विश्रांती? 

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-२० क्रिकेटमधूून निवृत्ती घेतली आहे. कसोटीतील खराब कामगिरीमुळे ही जोडगोळी ट्रोल होताना दिसते. त्यात चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेआधी होणाऱ्या वनडे मालिकेतून या वरिष्ठ खेळाडूंनी बुमराहसोबत ब्रेक घेतला तर त्यांना आणखी टिकेचा सामना करावा लागू  शकतो. कारण बुमराहची कामगिरी पाहता त्याला ब्रेकची निंतात गरज आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माला ब्रेकपेक्षा प्रॅक्टिसची गरज आहे. याच मुद्यावरून ते चाहत्यांच्या निशाण्यावर येऊ शकतात. 

बांगलादेशविरुद्धच्या लढतीनं टीम इंडिया करणार चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मोहिमेला सुरुवात 

इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेनंतर १९ फेब्रुवारीपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होईल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे या स्पर्धेचे यजमानपद असून भारतीय संघानं पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिल्यानंतर हायब्रिड मॉडेलनुसार ही स्पर्धा खेळवली जाईल. भारतीय संघाच्या साखळी फेरीतील लढतीसह सेमी फायनल आणि फायनल दुबईतील मैदानात नियोजित आहे. भारतीय संघ बांगलादेश विरुद्धच्या लढतीनं २० फेब्रुवारीला मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात करेल.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघरोहित शर्माविराट कोहलीजसप्रित बुमराह