Join us  

Rohit Virat, IND vs AUS 4th Test: टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर रोहित, विराट गेले सुट्टीवर! चाहते बुचकळ्यात

टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहोचण्यास भारतासाठी चौथी कसोटी अतिशय महत्त्वाची

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2023 4:57 PM

Open in App

Rohit Sharma Virat Kohli, IND vs AUS 4th Test: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. नागपूर आणि दिल्लीतील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने इंदूरमध्ये जबरदस्त पुनरागमन केले. आता मालिकेतील शेवटचा सामना ९ मार्चपासून अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचं तिकीट मिळणार की नाही हे या मॅचमध्ये ठरेल. इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाने ज्या प्रकारची कामगिरी केली आहे, ते पाहता अंतिम सामना भारतासाठी अटीतटीचा असेल हे नक्की आहे. असं असतानाच अहमदाबादमधील शेवटच्या लढतीपूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी आश्चर्यकारक निर्णय घेतला. दोघेही संघ सोडून सुटी एन्जॉय करायला गेल्याचे सांगण्यात आले.

माजी कर्णधार विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा सुट्टीसाठी गेले आहेत. त्याच वेळी त्यांचे सहकारी क्रिकेटर्स मात्र प्रशिक्षक राहुल द्रविडसोबत नेट्समध्ये घाम गाळताना दिसले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंदूरमध्ये ९ गडी राखून पराभव झाल्यानंतर टीम इंडियाने तेथील इनडोअर फॅसिलिटीमध्ये सराव केला. राहुल द्रविडने श्रेयस अय्यर, शुभमन गिल, केएस भरत या फलंदाजांसोबत वेळ घालवला. अश्विनही त्याच्या फलंदाजीवर काम करताना दिसत होता पण विराट व रोहित दोघेही सुट्टीवर गेले होते. ९ विकेट्सने मोठ्या पराभवानंतर दोघांचे सुट्टीवर जाणे चाहत्यांसाठी काही प्रश्न निर्माण करणारे ठरले.

विराट कसोटीत अजूनही 'फ्लॉप'- रोहित शर्माने कसोटी मालिकेत अप्रतिम फलंदाजी केली आहे. पण विराट कोहलीने या कसोटी मालिकेतील पाच डावांत अद्याप अर्धशतक झळकावलेले नाही. विराट कोहलीने आतापर्यंत ३ कसोटी सामन्यात केवळ २२च्या सरासरीने १११ धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या सर्वोत्तम ४४ धावा आहेत आणि हा खेळाडू फिरकीपटूंविरुद्ध धावा काढण्यात सतत अपयशी ठरत आहे. अशा परिस्थितीत विराट कोहली सराव करण्याऐवजी सुटीवर गेल्याने फॅन्सने ती बाब फारशी पटलेली नाही.

दरम्यान, अहमदाबादमध्ये ७ मार्चपासून सराव सत्राची सुरूवात होणार आहे. त्यासाठी टीम इंडिया सोमवारी संध्याकाळी अहमदाबादला पोहोचली आहे. सराव मंगळवारपासून सुरू होणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माही तिथे संघात सामील झाले आहेत. अहमदाबादमधील खेळपट्टी कशी आहे, हे अद्याप कळलेले नाही, पण वरवर पाहता येथेही फिरकीचा ट्रॅक पाहायला मिळेल. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाबरोबरच भारतीय फलंदाजांसाठीही येथे कठीण जाणार आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माविराट कोहलीआॅस्ट्रेलिया
Open in App