Join us  

Virat Kohli Rohit Sharma, IND vs WI 1st T20: रोहित, विराट दोघांनाही 'टी२० सम्राट' बनण्याची संधी; खुणावतोय एक मोठा विक्रम

टीम इंडिया बुधवारपासून वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० मालिका खेळणार आहे. ३ सामन्यांच्या या मालिकेत माजी कर्णधार विराट कोहली आणि विद्यमान कर्णधार रोहित शर्मा यांना विशेष विक्रम करण्याची संधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 11:19 AM

Open in App

कर्णधार रोहित शर्मा आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहली यांना वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत मार्टिन गप्टिलला मागे टाकण्याची संधी आहे. हे दोन्ही दिग्गज फलंदाज न्यूझीलंडचा सलामीवीर गप्टिलचा विक्रम मोडू शकतात. सध्या टी२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत गप्टिल पहिल्या क्रमांकावर आहे. पण विराट आणि रोहित दोघांनाही त्याचा विक्रम मागे टाकत टी२० सम्राट बनण्याची संधी आहे. वेस्ट इंडिज विरुद्धची सध्याची मालिका आजपासून (१६ फेब्रुवारी) कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला टी२० सामना आज संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा मैदानात उतरताच या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्यासाठी स्पर्धा करतील. मार्टिन गप्टिलने ११२ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ३२.६६ च्या सरासरीने ३२९९ धावा केल्या आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. त्याने ९५ सामन्यांपैकी ८७ डावांत ५२.०४ च्या सरासरीने ३२२७ धावा केल्या आहेत. विराट हा गप्टिलपेक्षा ७२ धावांनी मागे आहे. तसेच कर्णधार रोहित ११९ सामन्यांमध्ये ३३.३० च्या सरासरीने ३१९७ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

आत्तापर्यंत या तीन फलंदाजांनी टी२० आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये ३ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत विराट आणि रोहित यांच्यात टी२० सम्राट यांच्या आपापसात स्पर्धा करण्याव्यतिरिक्त, या दोन सर्वोत्तम फलंदाजांना T20 किंग बनण्याची संधीही असेल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतरही टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची मालिका खेळायची आहे, यावेळी न्यूझीलंडचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्यस्त असेल.

 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ
Open in App