भारतीय संघ मंगळवारी न्यूझीलंड विरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. टीम इंडियाने याआधीच मालिका जिंकली आहे. त्यामुळे भारतीय संघ अनेक महत्त्वपूर्ण बदलांसह उतरू शकतो, अशी अपेक्षा आहे. विराट कोहली, रोहित शर्मा यांनी तिसरा वनडे खेळू नये, असा सल्ला अनेक क्रिकेट तज्ज्ञ आणि माजी खेळाडूंनी दिला आहे. असे का म्हटले जात आहे आणि असे झाले तर टीम इंडियाचे प्लेईंग इलेव्हन कशाप्रकारचे असेल, याबद्दल जाणून घ्या...
भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकली असून २-० ने आघाडी घेतली आहे. तिसरा सामना २४ जानेवारीला इंदोरमध्ये होणार आहे. भारतीय संघ या सामन्यात अनेक बदलांसह उतरू शकतो असे म्हटले जात आहे. ज्या खेळाडूंना अद्याप संधी मिळाली नाही त्यांना प्लेइंग-11 मध्ये समाविष्ट केले जाऊ शकते, असाही अंदाज आहे.
क्रिकेट जाणकारांचा सल्ला
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री, माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यांच्यासह काही दिग्गजांनी विराट कोहली आणि रोहित शर्माने या सामन्यात विश्रांती घ्यावी, असा सल्ला दिला आहे. या वन डे सामन्याऐवजी वरिष्ठ खेळाडूंनी रणजी ट्रॉफीचा सामना खेळावा. कारण फेब्रुवारीमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे, असा सल्ला देण्यात आला आहे. टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू या मोठ्या आव्हानासाठी सज्ज व्हावेत अशा उद्देशाने या तयारीच्या पार्श्वभूमीवर माजी खेळाडूंनी हे सांगितले आहे. मात्र, असे होण्याची शक्यता कमीच दिसते. वन डे संघानंतर भारताला न्यूझीलंड विरुद्ध टी२० मालिकाही खेळायची आहे. त्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या वरिष्ठ खेळाडूंची निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना कसोटीचा योग्य सराव करता येऊ शकतो.
रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजसारख्या खेळाडूंना तिसऱ्या वन डे सामन्यात विश्रांती मिळाली, तर पूर्णपणे नवीन संघ मैदानात उतरू शकतो. त्याची अपेक्षा फारच कमी आहे पण असे होऊही शकते. रोहित-विराट व्यतिरिक्त शमी-सिराज हे देखील ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसाठी खूप महत्वाचे आहेत. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या संघाचे कर्णधारपद सांभाळू शकतो, तर विराट कोहलीच्या जागी रजत पाटीदारला खेळण्याची संधी मिळू शकते. दुसरीकडे, युजवेंद्र चहल, उमरान मलिक यांसारखे खेळाडूही अद्याप या मालिकेत खेळू शकलेले नाहीत. अशा स्थितीत या दोघांनाही तिसर्या वन डेत प्लेइंग-11 मध्ये सामील होण्याची आणि टीम इंडियासाठी धमाका करण्याची संधी असेल. २४ जानेवारीला न्यूझीलंड विरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना आहे, तर २७ जानेवारी, २९ जानेवारी आणि १ फेब्रुवारीला टी२० सामने रंगणार आहेत.