विराट कोहलीने भारतीय संघाचे सात वर्षे यशस्वी नेतृत्व केले. आता ही जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. विराटने त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले. पण त्याला World Cup किंवा IPL जिंकता आलं नाही. रोहितने मात्र IPLमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना पाच विजेतेपदं मिळवून दिली. त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात तुलना होणं हे स्वाभाविकच आहे. तशातच विराटच्या हाताखाली RCB कडून दमदार गोलंदाजी केलेल्या हर्षल पटेलने रोहितच्या कॅप्टन्सीचं कौतुक केलं आहे.
“रोहित शर्मा हा खूप शांत कर्णधार आहे. तो गोलंदाजाला चेंडू देतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो. काय करावं, कशी गोलंदाजी करावी.. हे सांगत बसत नाही. त्याउलट 'तुला काय करायचं ते माहित आहे, फक्त जा आणि गोलंदाजी कर', असा त्याचा अँटीट्युड असतो. तो तशा प्रकारचा कर्णधार आहे आणि मला अशा कर्णधारांच्या हाताखाली खेळायला आवडतं", असं हर्षल पटेल म्हणाला.
"मी गोलंदाजी करताना तीन प्लॅन तयार ठेवतो. जर एका प्रकारची गोलंदाजी करताना मला फटके पडायला लागले तर मला माहिती असतं की मी दुसरं काय केलं पाहिजे. माझ्या गोलंदाजीच्या वेळी इतरांना मला सल्ले दिलेले मला आवडत नाही. आणि रोहित शर्मा हा अगदी त्याच पद्धतीचा कर्णधार आहे. तो तुम्हाला येऊन सांगत बसत नाही. तुमच्यावर विश्वास ठेवतो. तो मैदानात अतिशय शांत असतो आणि तुम्हाला तुमचा वेळ घेऊ देतो", असंही हर्षलने नमूद केलं.