Rohit Sharma Virat Kohli, IND vs SL: भारतीय संघाने २७ जुलैपासून सुरु झालेल्या श्रीलंका दौऱ्यावरील पहिला टप्पा जिंकला. ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारताने २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली. तिसरा टी२० सामना उद्या संध्याकाळी ७ वाजता खेळला जाणार आहे. या मालिकेतील यशानंतर दौऱ्याचा दुसरा टप्पा हा वनडे मालिका असणार आहे. वनडे मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडू म्हणजेच कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली हे श्रीलंकेत दाखल झाले. पण नव्या दौऱ्याच्या सुरुवातीआधीच त्यांना एक 'नकोशी' गोष्ट घडली.
नक्की काय घडलं?
विराट-रोहितने श्रीलंकेत पाऊल ठेवले, तेव्हा छान ऊन होते. पण सराव सत्रासाठी ते कोलंबोच्या मैदानावर पोहोचले तेव्हा मुसळधार पाऊस सुरू झाला. यामुळे टीम इंडियाचे सराव सत्र रद्द करण्यात आले. इतकेच नव्हे तर कोलंबोमध्ये पुढील २ दिवस पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुढील आणखी सत्रही रद्द होऊ शकते. विराट, रोहित हे प्रतिभावान खेळाडू असले तरी मालिकेआधीचे सराव सत्र त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. या दोन्ही खेळाडूंनी टी२० विश्वचषक फायनल जिंकल्यानंतर (२९ जून) एकही सामना खेळलेला नाही. दोघेही सुटीवर होते. आता दोघेही २ ऑगस्टला श्रीलंके विरुद्ध पहिल्या वनडेत सामन्यात खेळणार आहेत.
विराट ७ वर्षानंतर वनडेसाठी श्रीलंकेत
महत्त्वाची बाब म्हणजे, श्रीलंका हा भारताचा शेजारी देश आहे. भारत-श्रीलंका यांच्यात अनेक द्विपक्षीय क्रिकेट मालिका होतात. पण विराट कोहली तब्बल ७ वर्षांनंतर श्रीलंकेत वनडे मालिका खेळण्यासाठी आला आहे. त्यामुळे वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी सराव महत्त्वाचा आहे.